गोंदिया: गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला २९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यिकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच परंतु, यंदा परतीचा पाऊस आणि त्यात अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आहे. दरम्यान मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टी, तिप्पटी ने वाढून गगणालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारा कोथींबीरही महागला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते. वांगे, टोमॅटो, भेंडी आदींना १० ते २० रुपये प्रति किलोचा दर मिळत होता, परंतु, गणेशोत्सव सुरू होताच लळीत सुरू झाला आणि भाजीपाला कडाडला. भाजीपाल्याच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. आता पितृपक्षात तर भाववाढीचा आलेख चढतच आहे. नागरिकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. एकीकडे भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> ओबीसींच्या हक्कासाठी २० दिवस अन्यत्याग करणारे रवींद्र टोंगे आहेत तरी कोण? जाणून घ्या…
पितृपक्षात भेंडी, दोडके चवळी शेंग आणि लाल भोपळ्याला अधिक मागणी असते. त्यामुळे ४० रुपये प्रति किलो असलेली चवळी शेंग आता ८० ते १०० रुपयांवर गेली आहे. दोडके ८० रुपये, वांगे ६० रूपयांवर पोहोचले आहे. वटाण्याची हिरवी शेंग तर चक्क २०० रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे.भाज्या महागल्याने याचा सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसत आहे. भाज्यांची आवक अशीच आणि मागणी पण अशीच राहिल्यास आणखी महिनाभर ही भाववाढ राहण्याचा अंदाज घाऊक भाजी विक्रेता संघाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजेश नागरीकर यांनी लोकसत्ता सोबत बोलताना सांगितले.