नागपूर : नागपुरात अठरा वर्षांवरील सगळ्या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावा प्रशासन करते. त्यामुळे गुरुवारी सुरू १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा होती. परंतु होळीसह मुलांच्या परीक्षामुळे जिल्ह्य़ात केवळ २७५ मुलांनीच लस घेतली. त्यामुळे या गटातील लसीकरण बेरंग झाल्याचे चित्र होते.
कोर्बेव्हॅक्स ही लस घेतलेल्यांमध्ये नागपूरच्या शहरी भागातील ८१ आणि ग्रामीण भागातील १९४ अशा एकूण २७५ मुलांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेकडून सकाळी सगळ्याच झोनमध्ये प्रत्येकी एक किंवा दोन १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. येथे मुलांच्या लसीकरणानंतर बसण्यासह पिण्यासाठी पाणी व इतरही सोय करण्यात आली होती. परंतु लसीकरण सुरू झाल्यापासून जवळपास सगळ्याच केंद्रांकडे मुलांनी लसीकरणासाठी पाठ फिरवण्याचे चित्र होते. दरम्यान, लसीकरण वाढवण्यासाठी महापालिकेच्या आयसोलेशनसह इतर काही केंद्रांनी आशा वर्करला परिसरातील वस्त्यांमधील या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी आणण्याची विनंती केली. त्यामुळे काही प्रमाणात परिसरातील मुलांना त्यांच्या पालकांचे समुपदेशनानंतर केंद्रात आणल्या गेल्याने काही प्रमाणात ही आकडेवारी वाढली. यावेळी येथील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालकांशी संवाद साधला असता होळीचा सन आणि मुलांची परीक्षा सुरू असल्याने तूर्तास लसीकरण टाळत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
नागपुरात पहिल्या दिवशी १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद होता. परंतु पुढे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक शाळेशी संपर्क साधत या वयोगटातील मुलांचे शाळेतच लसीकरणासाठी प्रयत्न करण्याचे संकेत महापालिकेच्या आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिले गेले. गुरुवारी एकदाचे या गटातील मुलांचे लसीकरण सुरू झाल्याने लस घेतल्यावर काहीही समस्या होत नसल्याचे बघत पुढे हळूहळू या गटात लसीकरणाला गती मिळण्याचीही आशाही वेगवेगळ्या केंद्रातील डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील एकाही केंद्रावर दोन कुप्यांचा वापर नाही
करोनाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसह इतरही वयोगटातील व्यक्ती व मुलांसाठी आलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींच्या एका कुप्पीत १० मात्रा राहत होत्या. परंतु १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आलेल्या कोर्बेव्हॅक्स या लसीच्या एका कुप्पीत तब्बल २० मात्रा आहे. परंतु ही कुप्पी फोडल्यावर एकाही केंद्रात ती पूर्णपणे संपली नाही. प्रत्येक केंद्रात ७ ते २० दरम्यानच मुले आल्याने तेवढय़ाच मात्रांचा वापर झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.