नागपूर : दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आलेल्या नाहीत.
सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.
महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले. या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील नागरिकांची गर्दी पोलिसांनी पांगवली. त्यामुळे अनेकांनी पोलिसांवरही रोष व्यक्त करीत पोलिसांविरुद्ध निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी लगेच क्युआरटी जवानांच्या मदतीने गर्दी पांगवली. सोमवारी रात्री झालेल्या या दंगलीचा परिणाम म्हणून मंगळवारी अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाल चौकात जाळपोळ
तणाव वाढत असल्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा महाल चौकात पोहचला. तोपर्यंत दोन्ही गटातील व्यक्तींनी रस्त्यावर जाळपोळ केली. रस्त्यावर टायर आणि काही लाकडे जाळून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जाळपोळ झाल्यामुळे सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाण्याचा मारा करीत आग विझवली. यादरम्यान काही युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला.