यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक नदी, नाल्यांना पूर आल्याने बहुतांश जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. उमरखेड तालुक्यातील चातारी व उमरखेड शहरात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. चातारी येथे आज ३० ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिक भयभीत झाले होते. सकल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
दुपारनंतर गावातील पूर उतरण्यास सुरुवात झाल्याचे प्रशासनाने सांगितले. उमरखेड येथे गावातील कालवा फुटल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाला. जिल्ह्यातील बेंबळा, अडाण आदी सर्वच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बेंबळा, वर्धा, अडाण आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा… मणिपूर घटनेचे पडसाद सुरूच… ‘आझाद हिंद’चा रास्तारोको!
आज शुक्रवारी दिवसभर सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्या शनिवार २२ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास दिले आहे.