अकोला : होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूत साजरा केला जाणारा महत्त्वाचा हिंदू सण. होलिका दहन हा एक विधी असून जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. दरवर्षी होलिका दहन सायंकाळच्या सुमारास केले. यंदा मात्र होलिका दहनाचा मुहूर्त रात्री उशिरा राहणार आहे. त्याचे कारण ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हिंदू महिन्याच्या फाल्गुनच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते. सणाला धार्मिक महत्त्व तर असतेच, पण शास्त्रीय महत्त्व देखील आहे. होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, या गोष्टीचे प्रतीक आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर कोतवाली चौकातील श्री बालाजी मंदिरात अकोला पुरोहित संघांची सभा घेण्यात आली. यात महाराष्ट्रीयन पंचांग, वल्लभ मणिराम, सम्राट, निर्णय सागर, मुहूर्त चिंतामणी आदी पंचांचे प्रमुख आधार घेऊन होलिका दहनचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

त्यानुसार यावर्षी होलिका दहन यंदा रात्री ११.२६ नंतर असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा १३ मार्च रोजी होळी, तर १४ मार्च रोजी धूलिवंदन आहे. गुरुवार १३ मार्च सकाळी १०.५ पासून भद्रा लागते. ही रात्री ११.२६ पर्यंत राहणार आहे. यानंतरच होलिका दहन करावे, असे शास्त्रात मत आहे. भद्राचे महत्व होलिका पर्वाला फार आहे. पूजन, प्रदक्षिणा, साखरगाठ्याचे हार, भस्म लावणे आदी प्रकारे होलिका पूजन करण्यात येते.

शहरामध्ये मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येते. अकोल्यात १०० वर मोठ्या होळी तर घरोघरी होलिका दहन करण्यात येते. होलिका दहनासाठी मुहूर्त बघितला जातो. सर्वसाधारणतः सायंकाळचा हा मुहुर्त असतो. मात्र, यंदा रात्री ११ वाजून २६ मिनिटानंतरचा मुहूर्त शुभ असल्याचे पुरोहित संघाकडून सांगण्यात आले आहे.

हार व पुजेची तयारी अगोदरच

१३ मार्च रोजी सकाळी १०.३५ वाजण्यापूर्वी हार व पुजेची तयारीचे कार्य संपन्न करावे लागणार आहे. वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारे होलिका दहन करण्यात येते. काही ठिकाणी भ्रदामध्येही होलिका दहन करतात, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सभेत पंडित रजनीकांत जाडा, रतन तिवारी, आलोक शर्मा, श्याम अवस्थी, प्रमोद तिवारी, अशोक शर्मा, हरीश उपाध्याय, सुरेश शिवाल, लाला तिवारी, सचिन शर्मा व पंडित रवी कुमार शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Story img Loader