अकोला : घरातील लाखो रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केल्याची माहिती कळताच घरमालकाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील हातगाव येथे घडली. अशोक नामदेवराव बोळे (६५) असे मृतकाचे नाव आहे. आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव नावाचे गाव आहे. या गावात घडलेल्या एका घटनेची चांगली चर्चा होत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी कर्ता पुरुष आयुष्यभर झटत असतो. कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह करून भविष्यासाठी कर्त्या पुरुषाकडून बचत केली जाते. सोन्या नाण्यात गुंतवणूक करण्यात येते. चोरट्यांची मात्र त्यावर वाईट नजर असते. आयुष्यभर कठोर परिश्रम करून जमवलेले संचित चोरट्यांनी क्षणार्धात लंपास केल्याचा मोठा धक्का अशोक बोळे यांना बसला. घरात चोरी झाल्याचे वृत्त कळताच घरमालक अशोक बोळे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

अशोक बोळे यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्यांनी शिरकाव करत सुमारे चार ते पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश होता. चोरी झाली तेव्हा घरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी संधी साधत ही लूट केली. काही वेळाने बोळे कुटुंबीयांनी घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच, अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र, घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

घरातील चोरीचा त्यांना मोठा धक्का बसल्याने अशोक बोळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा आणि मूर्तिजापूर पोलिसांनी संयुक्तपणे पंचनामा करत चोरी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील लोकांकडून माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.