अमरावती : सुमारे दोन वर्षांपुर्वी हनुमान जयंतीच्या पर्वावर स्वत:च्या वाढदिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरालगत श्री हनुमानाची १११ फूट उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता. आता या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून या परिसराला ‘हनुमान गढी’ असे नाव देण्यात आले आहे. लवकरच या मूर्तीचे लोकार्पण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात उंच हनुमान मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

छत्री तलावानजीक उभारण्यात येत असलेली ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा संपूर्ण परिसर तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राणा दाम्पत्याने हनुमान गढी स्थापन करण्यासाठी श्री हनुमान चालिसा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टला त्यांची ५० एकर जमीन दान केली. १११ फूट उंच मूर्तीची उभारणी दोन वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. ही मूर्ती एक किलोमीटर अंतरावरून देखील पाहता येते. आता पुतळ्याचे पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त लेप लावण्याचे काम शिल्लक आहे.

राजस्थानचे शिल्पकार ताराचंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दररोज १५ कामगार काम करत आहेत. या मूर्तीच्या जागेजवळील ३० एकरच्या संकुलात राम वाटिका तयार केली जात आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांच्या प्रतिकृती तयार होत आहेत.

गृहमंत्री अमित शहा करणार लोकार्पण हनुमान गढीचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना केले होते. आता आमदार रवी राणा यांनी माहिती दिली की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते १११ फूट ऊंच हनुमान मूर्तीचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू आहे. ते म्हणाले की, मूर्तीजवळ एक मोठे सभागृह बांधले जात आहे.

उंच गॅलरी बांधली जात आहे. ज्यामध्ये भक्तांना श्री हनुमान यांच्या जीवनाचे दर्शन करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. श्री क्षेत्र शेगावच्या धर्तीवर, ५ हजार भाविकांची क्षमता असलेले अन्नछत्र बांधले जात आहे. ५०० भाविकांसाठी भक्त निवास देखील तयार केला जात आहे. दररोज सकाळी ५ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता हनुमान चालिसा नियमितपणे पठण केले जात आहे. याशिवाय अखंड रामायण कार्यक्रम सुरू झाला आहे.