केरळ व कर्नाटकच्या धर्तीवर विकास अपेक्षित
आरोग्य यंत्रणा – भाग ४
आयुर्वेद व होमिओपॅथी ही जुनी उपचार पद्धती असली तरी त्याकडे शहरात फारसे लक्ष दिले गेले नाही. नागपूरला होमिओपॅथीचे शासकीय महाविद्यालय नसून आयुर्वेदामध्येही फारसे संशोधन होतांना दिसत नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत रुग्णांना याही पद्धतीच्या जागतिक आरोग्य सेवा शहरात मिळायला हव्या. शहरात होमियोपॅथीच्या राष्ट्रीय अनुसंधान केंद्रासह आयुर्वेदाच्या काही महत्वाच्या संस्था सुरू झाल्यास रुग्णांना केरळ व कर्नाटकच्या धर्तीवर आंतररुग्ण विभागासह विविध आरोग्याच्या सेवा फार कमी दरात उपलब्ध होईल, परंतु त्याकरिता शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
भारतातच नव्हे, तर जगातील सगळ्यात जुनी उपचार पद्धती म्हणून आयुर्वेद व होमिओपॅथीकडे बघितले जाते. नागरिकांचा आजही या उपचार पद्धतीवर विश्वास असून शहरातच नव्हे, तर दुर्गम व आदिवासीबहुल गावातही या डॉक्टरांकडे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या तुलनेत रुग्णांचा रांगा दिसतात. देशाच्या मध्यवर्ती शहराच्या दृष्टीने अद्यापही येथे होमिओपॅथी क्षेत्राचा विकास झाला नाही. वैद्यकीय निकषानुसार प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एका होमिओपॅथी महाविद्यालयाची गरज आहे, परंतु नागपूरची सध्याची लोकसंख्या कागदावर २५.५ लाख, तर वास्तविक (बाहेरून आलेले लोक पकडून) ४० लाखांवर असतांनाही येथे एकच खाजगी होमिओपॅथी महाविद्यालय आहे.
नागपूर महापालिकेकडूनही १९७८ साली शेवटचा होमिओपॅथी दवाखाना कुंजीलालपेठेत सुरू करण्यात आला होता. त्यानंतर अद्याप एकही दवाखाना वाढला नसून शहरात केवळ दोनच दवाखान्यात होमिओपॅथीची सेवा रुग्णांना मिळत आहे. होमिओपॅथीच्या शहरातील विविध संघटनांकडून वारंवार शहरातील नागरिकांच्या हिताकरिता मेडिकल व मेयोत रुग्णांना होमिओपॅथीची बाह्य़रुग्णसेवा देता यावी म्हणून जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह आंतररुग्णांकरिता दहा खाटांच्या वार्डाची मागणी केली गेली, परंतु त्यालाही केराची टोपली दाखवली गेली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात रुग्णांकरिता होमिओपॅथी डॉक्टरांची मागणी होऊनही त्याकडेही दुर्लक्ष केले गेले.
त्यामुळे या रुग्णांना शासकीय रुग्णालयात हा उपचार मिळणे शक्य होतांना दिसत नाही. आयुर्वेदाचीही स्थिती वेगळी नाही, परंतु शहरात एक शासकीय आयुर्वेदासह काही खाजगी रुग्णालये असल्याने होमिओपॅथीच्या तुलनेत त्यांची स्थिती थोडी चांगली आहे. होमिओपॅथीकडील दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना सगळ्यात स्वस्त व सुरक्षित उपचार समजल्या जाणाऱ्या पद्धतीचा लाभ फारसा होतांना दिसत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नागपूरला राष्ट्रीय होमिओपॅथी अनुसंधान केंद्र सुरू झाल्यास येथे या क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळेल. त्याने होमियोपॅथी व लसीकरण, कुपोषण, प्रसुतीदरम्यानच्या स्थितीवरील संशोधन, प्रदूषणामुळे वाढणाऱ्या अस्थमा, कॅन्सर, सिकलसेलसह विविध गंभीर आजारांवरही संशोधनाला वाव मिळेल. सोबत नागपूरसह विदर्भाच्या मुलांना नागपूरलाच होमिओपॅथीच्या पदवीसह पदव्युत्तरचेही अभ्यासक्रम करता येतील. भारतातील केरळ व कर्नाटक येथे सध्या होमिओपॅथीमध्ये उपचाराची चांगली सोय आहे. येथे मोठय़ा संख्येने रुग्ण उपचार घेतात. येथे संशोधनाकडेही तेथील शासनाचे लक्ष आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनानेही नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेत या पद्धतीचा गांभिर्याने विचार करण्याची गरज होमिओपॅथीसह आयुर्वेदक्षेत्रातील जाणकार करीत आहेत.

दुर्मीळ आजारांवर होमिओपॅथी उत्तम -डॉ. मनीष पाटील
भारताचा इतिहास बघितला तर प्राचीन काळात कॉलरानेही मोठय़ा प्रमाणावर मृत्यू होतांना दिसत होते. तेव्हा पश्चिम बंगालच्या एका राजाने भारतात होमिओपॅथी उपचार पद्धती आणली. यामुळे हे मृत्यू कमी करण्यात मोठे यश आले, परंतु कालांतराने राज्य व केंद्र शासनाच्या दुर्लक्षाने या उपचारावर हवे तसे संशोधनच झाले नाही. ते व्हावे म्हणून नागपूरला होमिओपॅथी संशोधनाची गरज आहे. त्याने कॅन्सर, मेंदूघात, अस्थमा, सिकलसेलसह सगळ्याच दुर्मिळ आजारांवरील रुग्णांना होमिओपॅथीचे अद्यावत उपचार मिळणे शक्य होईल.
या उपचार पद्धतीत धोका नसल्याने ही सगळ्यात सुरक्षित आहे. शहरात सध्या २५०० होमिओपॅथीचे डॉक्टर्स असून सुमारे ५०० खाजगी दवाखाने आहे, अशी माहिती ऑरेंजसिटी होमिओपॅथी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील यांनी दिली.

वनौषधांच्या बागा विकसित व्हाव्या -डॉ. छांगाणी
स्मार्ट सिटीअंतर्गत नागपूरला वनौषधांच्या बागा मोठय़ा प्रमाणावर विकसित केल्यास प्रदूषणावर नियंत्रण मिळेल. या बागांमध्ये नागरिकांनी भ्रमंती केली तरी त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. शहरात कडुनिंबाचे झाड जास्त लावल्यास त्वचारोगासह वायूकण श्वसनातून शरिरात गेल्यावर होणाऱ्या संसर्गावरही लाभ होईल. तुळशीच्या बागा रस्त्यांच्या दुभाजकावर सर्वत्र लावल्यास डासांसह विविध जिवाणूंवर नियंत्रण मिळेल. आयुर्वेद उपचार सुधारण्याकरिता गुजरातमधील सुरतच्या धर्तीवर शहरात आयुर्वेद रुग्णालय वाढून सगळ्या ठिकाणी अद्यावत पंचकर्म विभाग वाढण्याची आवश्यकता आहे. सोबत या क्षेत्रातील संशोधनाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे मत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे राज्य संघटनेचे सदस्य डॉ. जयकृष्ण छांगाणी यांनी व्यक्त केले.

Story img Loader