केरळ व कर्नाटकच्या धर्तीवर विकास अपेक्षित
आरोग्य यंत्रणा – भाग ४
आयुर्वेद व होमिओपॅथी ही जुनी उपचार पद्धती असली तरी त्याकडे शहरात फारसे लक्ष दिले गेले नाही. नागपूरला होमिओपॅथीचे शासकीय महाविद्यालय नसून आयुर्वेदामध्येही फारसे संशोधन होतांना दिसत नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत रुग्णांना याही पद्धतीच्या जागतिक आरोग्य सेवा शहरात मिळायला हव्या. शहरात होमियोपॅथीच्या राष्ट्रीय अनुसंधान केंद्रासह आयुर्वेदाच्या काही महत्वाच्या संस्था सुरू झाल्यास रुग्णांना केरळ व कर्नाटकच्या धर्तीवर आंतररुग्ण विभागासह विविध आरोग्याच्या सेवा फार कमी दरात उपलब्ध होईल, परंतु त्याकरिता शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
भारतातच नव्हे, तर जगातील सगळ्यात जुनी उपचार पद्धती म्हणून आयुर्वेद व होमिओपॅथीकडे बघितले जाते. नागरिकांचा आजही या उपचार पद्धतीवर विश्वास असून शहरातच नव्हे, तर दुर्गम व आदिवासीबहुल गावातही या डॉक्टरांकडे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या तुलनेत रुग्णांचा रांगा दिसतात. देशाच्या मध्यवर्ती शहराच्या दृष्टीने अद्यापही येथे होमिओपॅथी क्षेत्राचा विकास झाला नाही. वैद्यकीय निकषानुसार प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एका होमिओपॅथी महाविद्यालयाची गरज आहे, परंतु नागपूरची सध्याची लोकसंख्या कागदावर २५.५ लाख, तर वास्तविक (बाहेरून आलेले लोक पकडून) ४० लाखांवर असतांनाही येथे एकच खाजगी होमिओपॅथी महाविद्यालय आहे.
नागपूर महापालिकेकडूनही १९७८ साली शेवटचा होमिओपॅथी दवाखाना कुंजीलालपेठेत सुरू करण्यात आला होता. त्यानंतर अद्याप एकही दवाखाना वाढला नसून शहरात केवळ दोनच दवाखान्यात होमिओपॅथीची सेवा रुग्णांना मिळत आहे. होमिओपॅथीच्या शहरातील विविध संघटनांकडून वारंवार शहरातील नागरिकांच्या हिताकरिता मेडिकल व मेयोत रुग्णांना होमिओपॅथीची बाह्य़रुग्णसेवा देता यावी म्हणून जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह आंतररुग्णांकरिता दहा खाटांच्या वार्डाची मागणी केली गेली, परंतु त्यालाही केराची टोपली दाखवली गेली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात रुग्णांकरिता होमिओपॅथी डॉक्टरांची मागणी होऊनही त्याकडेही दुर्लक्ष केले गेले.
त्यामुळे या रुग्णांना शासकीय रुग्णालयात हा उपचार मिळणे शक्य होतांना दिसत नाही. आयुर्वेदाचीही स्थिती वेगळी नाही, परंतु शहरात एक शासकीय आयुर्वेदासह काही खाजगी रुग्णालये असल्याने होमिओपॅथीच्या तुलनेत त्यांची स्थिती थोडी चांगली आहे. होमिओपॅथीकडील दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना सगळ्यात स्वस्त व सुरक्षित उपचार समजल्या जाणाऱ्या पद्धतीचा लाभ फारसा होतांना दिसत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नागपूरला राष्ट्रीय होमिओपॅथी अनुसंधान केंद्र सुरू झाल्यास येथे या क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळेल. त्याने होमियोपॅथी व लसीकरण, कुपोषण, प्रसुतीदरम्यानच्या स्थितीवरील संशोधन, प्रदूषणामुळे वाढणाऱ्या अस्थमा, कॅन्सर, सिकलसेलसह विविध गंभीर आजारांवरही संशोधनाला वाव मिळेल. सोबत नागपूरसह विदर्भाच्या मुलांना नागपूरलाच होमिओपॅथीच्या पदवीसह पदव्युत्तरचेही अभ्यासक्रम करता येतील. भारतातील केरळ व कर्नाटक येथे सध्या होमिओपॅथीमध्ये उपचाराची चांगली सोय आहे. येथे मोठय़ा संख्येने रुग्ण उपचार घेतात. येथे संशोधनाकडेही तेथील शासनाचे लक्ष आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनानेही नागपूरच्या स्मार्ट सिटी योजनेत या पद्धतीचा गांभिर्याने विचार करण्याची गरज होमिओपॅथीसह आयुर्वेदक्षेत्रातील जाणकार करीत आहेत.
‘होमिओपॅथी व आयुर्वेदा’चेही संशोधन व उपचार केंद्र हवे
आयुर्वेद व होमिओपॅथी ही जुनी उपचार पद्धती असली तरी त्याकडे शहरात फारसे लक्ष दिले गेले नाही.
Written by झियाऊद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-12-2015 at 02:15 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homeopathy and ayurveda research and treatment center needed in smart city