लोकसत्ता टीम

नागपूर: ‘मी लेस्बियन असून भविष्यात लग्नासाठी खूप अडचणी येतील. लग्नानंतर मला सुखी संसारही करता येणार नाही. समाजही मला विरोध करेल, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी चिठ्ठी लिहून एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तनिष्का असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्का ही सीताबर्डीतील एका महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. तिचे वडील केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत असून ते मुळचे उत्तरप्रदेशातील आहेत. आई-वडील व लहान भावासोबत गिट्टीखदान परीसरात राहायची. ती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आपल्या कुटुंबियांना त्याबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे आईवडिलांना धक्का बसला होता. त्यामुळे तिच्या वागण्याकडे आईवडिल लक्ष ठेवून असायचे. तिला वारंवार समूपदेशन करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पालकांच्या वारंवार टोकण्यामुळे तनिष्का नैराश्यात गेली होती.

हेही वाचा… नागपूरकरांना शहर सौंदर्यीकरणाचे वावडे? ‘सी-२०’साठी लावलेल्या वस्तूंची चोरी

रविवारी दुपारी तिचे आईवडील व भाऊ बाहेर गेले होते. तनिष्काने छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी तिला तातडीने मेयो इस्पितळात नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा… संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांमध्ये संस्कारांचे बीजारोपण – रामदत्त

आत्महत्या करण्याअगोदर तिने सुसाईड नोट लिहीली होती. लेस्बियन असल्याने तिचे कुटुंबीय तसेच समाज तिला विरोध करत आहे. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने ती हे कठोर पाऊल उचलत असल्याचे तिने त्यात म्हटले आहे. तिने चिठ्ठीत आपल्या कृत्याबद्दल तिच्या पालकांची माफीदेखील मागितली. सोमवारी तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह अंतिम संस्कारासाठी त्यांच्या गावी घेऊन गेलेल्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला.

Story img Loader