वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठान मानस मंदिरचा प्राचार्य भाऊसाहेब देशमुख स्मृती ‘संतसेवक’ हा पुरस्कार ज्येष्ठ प्रचारक विजय मंथनवार गुरूजी यांना जाहीर झाला आहे.मानस मंदिरात आयोजीत एका समारंभात रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व शालश्रीफळ स्वरूपातील हा पुरस्कार मंथनवार गुरूजी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य जीवन देशमुख (अमरावती) यांची मुख्य उपस्थिती होती.संतसेवक हा पुरस्कार संतांच्या विचारानुसार सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिल्या जातो. विजय मंथनवार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असतांनाच विविध सेवाभावी संस्थाशी जुळले. गुरूकुंज आश्रम मोझरी येथील गुरूदेव सेवामंडळाच्या प्रकाशन विभागाचे ते प्रमुख होते. तसेच श्री गुरूदेव मासिकाचे प्रबंधक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
आर्वी नशाबंदी परिषदेचे अध्यक्ष, मराठी माध्यमिक शिक्षकसंघ व अन्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सेवाभावी कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानचे सहसचिव म्हणून त्यांनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा सर्वत्र प्रसार केला. मानस मंदिरच्या माध्यमातून ते अद्यापही विविध उपक्रमांशी जुळले आहे. त्यांना हा पुरस्कार देण्यात गौरव प्राप्त होत असल्याचे मत प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केले.प्राचार्य भाऊसाहेब देशमुख यांना अपेक्षीत माणूस घडविण्याचे कार्य ग्रामीण भागात मंथनवार गुरूजी यांनी केले. समाजाला आज अश्याच व्यक्तींची गरज असल्याचे मत प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केले. मानपत्राचे लेखन व वाचन मनिष जगताप यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना मंथनवार गुरूजी म्हणाले की मला आयुष्यात अन्य पुरस्कार पण मिळाले. पण भाऊसाहेबांच्या नावे दिल्या जाणारा हा पुरस्कार माझ्यासाठी कायमचा कौटुंबिक ठेवा आहे.१९७१ मध्ये सामूहिक ग्रामगीता वाचन उपक्रम सूरू करण्याचा विचार भाऊसाहेबांनी मांडला. त्यानंतर संस्था स्थापन झाली. पुढे तुकडोजी महाराज यांचे विचार समाजात नेण्यासाठी कार्य सूरू झाले. राष्ट्रसंतांच्या विचारानुसार कार्य करण्याचा वसा आपण कधीच सोडणार नाही, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>उदरनिर्वाहासाठी ‘ती’ तेंदूपत्ता तोडायला गेली….पण, बिबट्या काळ बनून आला आणि…
कार्यक्रमाचे संचालन राजु ठाकरे यांनी केले. पुरस्कार आयाेजनात ह.भ.प.पुण्यदासजी चरडे, वसंतराव ठाकरे,प्रशांत देशमुख प्रा.नितीन देशमुख, वैशाली अजय शिंदे, प्राचार्य सतीश जगताप यांनी भूमिका पार पाडली.पाहुण्यांचे स्वागत चंद्रवीर व स्पंदन देशमुख यांनी केले. आयोजनात मुख्याध्यापक मारोती बरडे तसेच मंडळाचे शालिग्रामजी वानखेडे, अजय ठाकरे, समीर देशमुख,बेलोणकर, मनीष जगताप, कोमल देशमुख, मनोज उईके, लाजूरकर मॅडम, डॉ. बोबडे, वनिता देशमुख, अल्का देशमुख, शिल्पा देशमुख, प्रज्ञा देशमुख, अजय शिंदे, मीना पठाडे, मधुकर वाघमारे आदिनी योगदान दिले.