नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात हुक्का पार्लरने पुन्हा जोर धरला असून अनेक तरुण-तरुणींचे लोंढे हुक्का पार्लरमध्ये दिसत आहेत. अवैधरित्या हुक्का पार्लरला स्थानिक पोलीस ठाण्यातून आशिर्वाद असून पार्लरमध्ये ‘ड्रग्स पॅडलर’ अंमली पदार्थही पुरवित असल्याची माहिती आहे. नुकताच पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरमध्ये छापा घातल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्यात ‘सेटिंग’ करून हुक्का पार्लर सुरू झाले आहेत. रात्री ८ पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत हुक्का पार्लरमधे ‘दम मारो दम’ सुरू आहे.
पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लरवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले होते. परंतु, काही ठाणेदार आणि गुन्हे शाखेचे पथक प्रमुख पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. ठाणेदार आणि गुन्हे शाखेच्या पथक प्रमुखांकडून परवानगी घेऊनच हुक्का पार्लर बिनधास्त चालविल्या जात आहेत.पार्लरच्या संचालकाच्या ‘सेटिंग’मुळे पोलीस उपायुक्तांच्या पथकांना हुक्का पार्लरवर छापे घालावे लागत असल्याची परिस्थिती आहे. अगदी हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत हुक्का पार्लरमध्ये गुडगुड आवाज करीत मौजमस्ती करता येत असल्यामुळे महागड्या कारने तरुणी-तरूण मध्यरात्रीपर्यंत पार्लरमध्ये येतात.
हेही वाचा : गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार
हुक्का पिणाऱ्यांमध्ये उच्च्भ्रू तरुण-तरुणी व बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हुक्क्यासह अंमली पदार्थही उपलब्ध केल्या जात असल्यामुळे तरुणी व्यसनाधीन होत आहे. हुक्क्यात सुपारी, पानरसना, चॉकलेट, अलादीन, मायामी, स्टोन वॉटर, आईसमिंट या प्रकारच्या फ्लेवरची जास्त मागणी आहे. हुक्का पार्लरची कमाई महिन्याकाठी लाखोंमध्ये असल्यामुळे संचालकांकडून पोलिसांवरही पैसे उधळल्या जात असल्याची चर्चा आहे.पाचपावली, अंबाझरी-धरमपेठ या परिसरात सर्वाधिक हुक्का पार्लर आहेत. पाचपावलीतील बारच्या वर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तर थेट उपायुक्त राजमाने यांना छापा घालावा लागला होता. त्यासह आता गिट्टीखदान, सदर, सीताबर्डी, बजाजनगर, पाचपावली-इंदोरा चौक, तहसील, लकडगंज, जरीपटका, सक्करदरा, हिंगणा, एमआयडीसी आणि गणेशपेठ परिसरातही हुक्का पार्लर सुरू झाले आहे.
नागपूर गुन्हे शाखेची तुलना मुंबई गुन्हे शाखेशी केल्या जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. शहरात पोलीस ठाण्याच्या अगदी २०० मीटर अंतरावर अवैधरित्या दारू विकल्या जात आहे. वरली-मटका मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जुगार अड्ड्यांकडे तर अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. गाईची तस्करी करणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्या जात आहेत. रात्री दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या ढाबे आणि हॉटेलमध्ये बिनधास्त दारु पिण्याची मुभा आहे. प्रत्येक पथकात एक ‘मनी कलेक्टर’ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
शहरात कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. हुक्का पार्लर बंद करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. जर कुणी लपून छपून हुक्का पार्लर सुरू ठेवत असेल तर त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी स्पष्ट केले आहे.