नागपूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक नावे आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांचा ‘पद्धतशीर’ पत्ता कापला अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. भाजपने आज लोकसभा-विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची यादी जाहीर केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख करण्यात आले आहे. ते याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
भाजपचे शहराध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांच्याकडे नागपूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांची नियुक्ती याच मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूरची दंगल सरकार पुरस्कृत! आमदार विजय वडेट्टीवार यांचा आरोप
अकोला मतदारसंघाचे प्रमुख म्हणून अनुप धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे धोत्रे कुटुंबाला भाजपची अकोला लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघातून चरण सिंग ठाकूर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना निवडणूक प्रमुख केल्याने आता विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी पोद्दार यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
उमरेड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन आमदार सुधीर पारवे यांचा काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी पराभव केला होता. आता सुधीर पारवे यांना भाजपने निवडणूक प्रमुख बनवल्याने पारवे यांना निवडणुकीत तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. २०१९च्या निवडणुकीत संदीप जोशी हे फडणवीस यांचे निवडणूक प्रमुख होते. मात्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे माजी नगरसेवक व दक्षिण पश्चिम भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> सावधान! शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?
साकोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून परिणय फुके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपने परिणय फुके यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांनी फुके यांचा पराभव केला होता. फुके हे भंडारा, गोंदिया येथे अत्यंत सक्रिय आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे तिकीट मिळणार याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आता त्यांच्यावर साकोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याने त्यांचा पत्ता कट होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.