लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : मेळघाटातून बुलढाणा जिल्‍ह्यात रस्‍त्‍याच्‍या कामावर गेलेल्‍या मजुरांना अनियंत्रित ट्रकने चिरडल्‍याने तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात बुलढाणा जिल्‍ह्यातील नांदूरा ते मलकापूर दरम्‍यान राष्‍ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी घडला.

प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६) आणि अभिषेक रमेश जांभेकर (१८, सर्व रा. मोरगड, ता. चिखलदरा) अशी मृतांची नावे आहेत. मोरगड येथील दहा मजूर कामाच्‍या शोधात बुलढाणा जिल्‍ह्यात पोहचले होते. नांदुरा ते मलकापूर दरम्‍यान रस्‍त्‍याचे काम सुरू असल्‍याने त्‍यांना त्‍या ठिकाणी काम मिळाले. मुक्‍कामाची सोय म्‍हणून रस्‍त्‍याच्‍या कडेला तात्‍पुरते शेड उभारण्‍यात आले होते. हे सर्व मजूर या शेडमध्‍ये झोपलेले असताना सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास पीबी ११ / सीझेड ४०४७ क्रमांकाचा आयशर ट्रक अनियंत्रित होऊन शेडमध्‍ये शिरला. शेड उध्‍वस्‍त झाले आणि सात मजूर ट्रकखाली चिरडले गेले. हा अपघात नांदूरा ते मलकापूर दरम्‍यान वडनेर भुलजी या गावाजवळ घडला.

आणखी वाचा-तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, पहा एका क्लिकवर…

या अपघातात प्रकाश जांभेकर, पंकज जांभेकर या दोन तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर अभिषेक जांभेकर याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. दीपक खोजी बेलसरे (२५), राजा दादू जांभेकर (३५) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्‍यांच्‍यावर मलकापूर येथील शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल साहेब यांनी बुलढाणा येथे सम्पर्क करून माहिती जाणून घेतली.

कामाच्या शोधात गेलेल्‍या तीन मजुरांना आज सकाळी ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना माहिती झाली. याबाबत आम्ही तत्काळ स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गंभीर जखमी असलेल्या दोघांसाठी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्‍याच्‍या हालचाली सुरू असून आमची एक चमू घटनास्थळी रवाना झाली आहे. जखमींना सर्व प्रकारची मदत केली जात आहे, असे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horrific accident in buldhana melghat laborers crushed by truck three people dead mma 73 mrj
Show comments