नागपूर : सकाळी लग्नाची वरात निघणार होती…ऐनवळी घाई नको म्हणून मालकाने नवरदेवासाठी रात्रीच घोडा सजवून ठेवला… सर्व तयारी करुन घोडामालक एकदाचा झोपला…. मात्र, रात्रीतच आक्रित घडले… चिक्कार फिरूनही काहीच हाती न लागलेल्या चोरट्यांना हा सजवेला घोडा दिसला…मालक गाढ झोपेत होता….चोरट्यांनी ही संधी साधली व दोन लाख रुपये किंमतीचा सजवलेला घोडा घेऊन पळ काढला….इकडे वरातीसाठी घोडा येईल म्हणून वाट पाहणाऱ्या नवरदेवाची मात्र मोठीच पंचाईत झाली… अजब चोरीची ही गजब घटना नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संतोष कुमार (६०, रा. आदिवासी सोसायटी, वृंदावन कॉलनी, गिट्टीखदान) यांचा लग्नात घोडे पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे पांढराशुभ्र नुखऱ्या प्रजातीचा घोडा आहे. त्यांनी हा घोडा आपल्या अंगणात बांधून ठेवला होता.
हेही वाचा >>> वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
शनिवारी सकाळी एका ठिकाणी लग्न असल्यामुळे घोड्याला रात्री सजविण्यात आले. त्याला खायला घालून संतोष कुमार झोपी गेले. परंतु, अज्ञात आरोपीने शुक्रवारी मध्यरात्री घोडा चोरून नेला. सकाळी उठल्यानंतर संतोष यांनी तयारी केली आणि नवरदेवाकडील मंडळीचा पत्ता घेऊन तासाभरात पोहचणार असल्याचे कळविले. परंतु, तयारी करून घराबाहेर पडताच घोडा जागेवर दिसला नाही. त्याचा दोर सुटून तो कुठेतरी बाजूच असेल, असे संतोष यांना वाटले. त्यांनी घोड्याचा शोध घेतला असता घोडा कुठेही आढळला नाही. दुसरीकडे नवरदेव वरातीसाठी तयार झाल्याचा फोन आला. आता संतोष पेचात पडले. घोडा दिसत नाही आणि नवरदेव ताटकळत बसलाय. शेवटी घोडा चोरुन नेल्याच्या निष्कर्षावर संतोष पोहचले. यादरम्यान, नवरदेवाचा एक मित्र घोड्यासाठी संतोष यांच्या घरी पोहचला. संतोष डोक्याला हात लावून बसले होते. त्यांनी घोडा चोरी झाल्याची माहिती नवरदेवाच्या मित्राला सांगितली. त्याने ही माहिती नवरदेवाला दिल्याने लग्न मंडपीसुद्धा गोंधळ उडाला. दुसरीकडे पोलीसही तक्रार बघून हैराण झाले. आता चोरट्याचा शोध घेण्यासह घोड्याचाही शोध घेण्याची वेळ पोलिसांवर आली. गिट्टीखदान ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तीन पोलीस कर्मचाऱ्याचे पथक घोड्याच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले तर घोडामालक नवरदेवाच्या मित्राची समजूत घालत बसला.