बुलढाणा : चिखली येथील एका हॉस्पिटल संचालक डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यानंतर हा रंगेल डॉक्टर फरार झाला आहे. डॉक्टरांना जनसामान्य विशेष करून रुग्ण देवदूत समजतात. पण त्याच डॉक्टरने राक्षसी कृत्य केल्याने समाजमन सुन्न झाले असून संताप व्यक्त होत आहे.
स्वतःचा व्हिडिओही बनवला
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला केबिनमध्ये बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करतो. एवढेच नव्हे चाळे करताना त्याने स्वतःचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणामुळे डॉक्टरच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा सुरू झाली आहे
जमावाने दिला चोप
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरला त्याच्याच हॉस्पिटलमध्ये १२ ते १५ जणांच्या जमावाने चांगलेच चोप दिला असल्याची चर्चा आहे. हा प्रकार पोलिसांकडे अधिकृतरित्या नोंदवला गेला नसला तरी, डॉक्टरने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर हॉस्पिटल बंद
घटनेनंतर हॉस्पिटल सध्या बंद आहे आणि डॉक्टर गायब असल्याचे समजते. या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डॉक्टरच्या या वर्तनामुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. हॉस्पिटलमध्ये महिलांसोबत असे प्रकार घडणे, आणि त्यावर कोणतीही तक्रार नोंदवली जात नसल्याने अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. हे हॉस्पिटल एका सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या मालकीच्या जागेत चालवली जात असल्याचे समजते. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवर अशा प्रकारे होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. हा प्रकार समाजाला हादरवून टाकणारा असून, या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. आता पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.