नागपूर : भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा जबाब घेण्याबाबत मानसोपचार विभागाचा सल्ला मागितला आहे. कारण, या जबाबनंतरच घटनेची वास्तविकता पुढे येणार आहे.
आधी पीडिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. कुणीही भेटायला गेल्यावर ती रडायची. कुणाशी बोलतही नव्हती. त्यामुळे मेडिकलमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तिला समुपदेशनातून आधार देण्याचा प्रयत्न करत होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने तिची प्रकृती आता सुधारत आहे. मात्र, घटनेची सविस्तर माहिती कळावी म्हणून पोलिसांना तिचा जबाब हवा आहे. त्यासाठी डॉक्टरांनी ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे काय, हे तपासण्यासाठी मानसोपचार विभागाला सल्ला मागितला आहे.
हेही वाचा >>> भंडारा बलात्कार प्रकरण : अत्याचार करणारा चौथा आरोपी कोण?
घटना काय? भंडारा जिल्ह्यात या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर अत्यवस्थ तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर तातडीने एक मोठी शस्त्रक्रिया झाली. आता पुन्हा काही शस्त्रक्रियांची गरज पडू शकते, अशी शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.