अमरावती : मेळघाटात अजूनही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. पोट फुगताच मुलाच्‍या पोटावर चटके दिले जातात. त्‍याला डम्‍मा देणे म्‍हणतात. हा प्रकार अमानवी असूनही ही चुकीची प्रथा अजूनही सुरूच आहे.अनेक चिमुकल्‍यांना या डम्‍मा प्रकारातून यापूर्वी जीव गमावावा लागला आहे. मेळघाटातील सिमोरी या गावात २२ दिवसांच्‍या बालकाच्‍या पोटावर त्‍याच्‍या आईनेच अंधश्रद्धेतून चटके दिल्‍याची घटना महिनाभरापुर्वी उघडकीस आली होती. या बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. तब्बल महिनाभरानंतर या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ट्वीट’ द्वारे ही माहिती दिली आहे.

आपण करत असलेल्या कामाचे समाधान देणारे जे काही क्षण आपल्या आयुष्यात येतात, त्यापैकी हा माझ्या आयुष्यातील हा  क्षण होता, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सिमोरी या गावातील फुलवंती राजू अधिकारी यांच्या २२ दिवसाच्या बाळाला ऱ्हदयाचा त्रास असल्याने ते बाळ सतत रडत होते.घरगुती उपचारांच्या नावाखाली अज्ञान व अंधश्रद्धेतून त्या बाळाच्या आईने त्या कोवळ्या जीवाच्या पोटावर चटके दिले. लेकराची स्थिती अतिशय चिंताजनक व गंभीर झाली. या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. सुरुवातीला त्या बाळाला अमरावतीत उपचार देण्यात आले. पण, प्रकृती अधिक गंभीर होऊ लागली. त्यामुळे तत्काळ नागपूर येथील नेल्सन रुग्णालयात आम्ही बाळाला दाखल करण्याचा निर्णय घेतला.

बाळ वाचेल की नाही,  ही धाकधुक आम्हा सर्वांच्या मनात होती. परंतु, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, आई जगदंबेचे आशीर्वाद, सर्वांच्या प्रार्थना, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून सर्वांनी केलेली धावपळ यातून त्या कोवळ्या जीवाला जीवनदान मिळाले.मी सतत डॉक्टर व प्रशासनाच्या संपर्कात होतो. जेव्हा मला बाळ सुखरूप आहे, ही बातमी समजली तो माझ्यासाठी समाधानाचा परमोच्च क्षण होता. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, नेल्सन रुग्णालयाच्या संचालिका राधा शाहू, वित्त संचालक गणेश खरोडे, केंद्र प्रमुख डॉ. सोनालकुमार भगत, डॉ. एस. पी. राजन, डॉ. निलेश दारव्हेकर, डॉ. सचिन कुथे आणि डॉ. कुलकर्णी यांच्यासह नेल्सन रुग्णालयातील सर्व  कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचा यात सिंहाचा वाटा आहे. त्या कोवळ्या जीवाच्या पुढील उपचारांची व भविष्याची जबाबदारी सरकार घेत आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.