तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांना अल्पदरात घरे (सदनिका) देण्याची अभिनव घरकूल योजना नागपूर सुधार प्रन्यासने तयार केली असून त्यांचे बचतगट स्थापन करून त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच गृहप्रकल्प आहे.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पंतप्रधान घरकूल योजना राबवली जाते. त्यासाठी नासुप्रने अर्ज मागवले आणि लॉटरी पद्धतीने सदनिका वाटप सुरू केले. यादरम्यान शहरातील काही तृतीयपंथीयांनी नासुप्रशी संपर्क साधून त्यांना या योजनेतून घरे मिळावी, अशी विनंती केली. त्यांना कोणी घर भाड्याने देत नाही. भूखंड विकत घेऊन घर बांधण्याची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे अनेक जण झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यामुळे शासकीय योजनेतून सवलतीच्या दरात घरे मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी एका गटाने ४०० जणांची यादीही नासुप्रला दिली. यावर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार केला.
इतर अर्जदारांच्या इमारतींमध्ये तृतीयपंथीयांना सदनिका दिल्यास विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र इमारतीमध्ये सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीमध्येच बचतगट स्थापन करून आरोग्य तपासणी केंद्र व स्वस्त धान्य दुकानही सुरू करण्याचे ठरले. यासंदर्भातील प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठवला व यासाठी किन्नर महामंडळाकडून निधी उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली. समाज कल्याण विभागाने अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण अद्याप ही रक्कम नासुप्रला प्राप्त झाली नाही.
योजनेत एका सदनिकांची किंमत सहा लाख रुपयांपर्यंत आहे. यापैकी समाज कल्याण विभाग अडीच लाख देणार असून फक्त १० टक्के रक्कम अर्जदाराला द्यायची आहे. त्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम पंतप्रधान घरकूल योजना व राज्य सरकारच्या निधीतून दिली जाणार आहे. समाजकल्याणचा निधी प्राप्त झाल्यावर पात्र तृतीयपंथीयांना सदनिका वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे नासुप्रकडून सांगण्यात आले.