अकोला : स्वत:चे पक्के घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता लाखो ग्रामीण भागातील कुटुंबाचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण २२ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सर्वांसाठी घरे’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना राबवण्यात येतात. १ जानेवारी २०२५ पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर केले जाणार आहे. १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ताचे देखील वितरण होईल. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार १९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश पत्र प्रदान केले जाईल. यापैकी १३ हजार लाभार्थ्यांना यापूर्वीच पहिल्या हप्त्याचे वितरण केले. उर्वरित २४ हजार ६०४ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पुणे येथे २२ फेब्रुवारीला कार्यक्रम होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण वाशीम जिल्हा परिषदेच्या सभागृहात होईल. सोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन देखील थेट प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिली.

लाभार्थ्यांना आणखी तीन लाभ

म. गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेतून ९० दिवसाच्या मजुरीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला नाही, अशा घरकुलधारकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येतील. तसेच पं. दीनदयाल उपाध्याय योजनेतून एक लाख रुपये जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत असून, राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हप्ते वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.