लोकसत्ता टीम

अमरावती : तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असून हे भारत तसेच जागतिक स्तरावरील चिंतेचे कारण ठरत आहे. भारतामध्ये सुद्धा सामान्यतः एकूण लोकसंख्येच्या सरासरी १४ टक्के लोक कोलेस्ट्रॉलच्या विकारांनी ग्रस्त आहेत.

‘एलडीएल कोलेस्ट्रॉल’ची वाढलेली पातळी हा हृदयविकारास कारणीभूत ठरणारा आघाडीचा घटक आहे. कारण ‘एलडीएलसी’ची वाढलेली पातळी धमण्यांमध्ये प्लाक जमा करते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पण जोपर्यंत एखादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवत नाही तोपर्यंत उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. हे हृदयाशी संबंधित समस्यांना रोखण्याच्या दृष्टीने खूप गरजेचे मानले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधींवर जगभरात संशोधन चालू आहे.

आयुर्वेदीय ‘भावप्रकाश’ या ग्रंथामधे एरंड वृक्षाच्या मूळाचा वापर स्थूलता किंवा मेदोरोगाच्या चिकित्सेसाठी आला आहे. या संदर्भाचा आधार घेत मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातील कायचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील बोरकर यांनी एरंड मुळाच्या ‘डिस्लिपिडेमिया’ मधील उपयुक्ततेवर पीएच. डी. अंतर्गत शोधकार्य केले.

एरंडमूळाच्या वापराने ‘डिस्लिपिडेमिया’ आजारातील वाढलेले ‘एलडीएल कोलेस्ट्रॉल’ तसेच ‘ट्रायग्लिसराइड्स’चे प्रमाण कमी झाल्याचे निष्पन्न झाले. एरंडमूळ मधूर, तिक्त, कषाय रसात्मक व उष्ण वीर्याचे व वातकफशामक असल्याने तसेच ‘रिसीन’ या कार्यकारी तत्वामुळे कोलेस्ट्रॉल तसेच ट्रायग्लिसराइड्स चे प्रमाण कमी करते. हे दोन्ही कोलेस्ट्रॉल संबधित घटक कमी झाल्याने हृदयरोग तसेच परालिसिस सारखे विकार टाळता येऊ शकतात. एरंडमूळ हे भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणतेही दुष्परिणाम न होता दीर्घकाळ वापर करता येऊ शकतो. त्यादृष्टीने डॉ. सुनील बोरकर यांचे शोधकार्य महत्वाचे मानले जात आहे.

डॉ. सुनील बोरकर यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नुकतीच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सुनील बोरकर यांनी यवतमाळ येथील डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंध सादर केला.

या संशोधनाबद्दल डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर, प्राचार्य डॉ. मुरलीधर खारोडे यांनी डॉ. बोरकर यांचे अभिनंदन केले आहे.

Story img Loader