महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मेडिकलशी संलग्नित बी. एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने केवळ अर्धीच पाणीपुरी खाल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत मेडिकलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) या विद्यार्थिनीचे वैद्यकीय अहवालही दिले जात नसल्याने मेडिकलकडून लपवा-छपवी होत असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.

जम्मू कश्मीर येथील शीतल राजकुमार (१८) या विद्यार्थिनीचा मृत्यू मेडिकल रुग्णालयात ६ जुलैच्या रात्री झाला. प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार, दूषित पाणीपुरीमुळे ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’ हे कारण असल्याचे मेडिकलकडून सांगितले गेले. एफडीएकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शीतलसोबत पाणीपुरी खायला गेलेल्या विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला. त्यानुसार, शीतलला बरे नसल्याने तिच्या तोंडाला चव नव्हती. तिने एक प्लेट पाणीपुरी घेतली, परंतु अर्धीच खाल्ली. इतर पाणीपुरी तिच्या मैत्रिणीनेच खाल्ल्या. शीतलची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकलला दाखल केले. येथे ६ जुलैच्या रात्री तिचा मृत्यू झाला. तिच्या मैत्रिणीची प्रकृती नंतर काही दिवसांनी बिघडली. जर ही अन्नातून विषबाधा असती तर दोघांनाही काही वेळेच्या अंतरानेच त्रास झाला असता, असे एफडीएचे म्हणणे आहे. एफडीएने मेडिकलला विद्यार्थिनीचा वैद्यकीय अहवाल व इतर ११ प्रकारची माहिती मागवली. परंतु एकही माहिती अद्याप दिली गेली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

आणखी वाचा-महिला डॉक्टर अंघोळ करताना दुसऱ्याकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग.. मेडिकलमध्ये नेमकं काय घडलं?

‘विषमज्वर’चे निदान

शीतल आजारी पडल्यावर तिच्या रक्ताचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यात विषमज्वरचे निदान झाल्याचा अहवाल एफडीएच्या हाती लागला आहे. विषमज्वर विकसित व्हायला सुमारे सात दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या आजाराची बाधा तिला आधीच झाल्याची शक्यता आहे. हा अहवाल उपचाराच्या कागदपत्रात नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

मेडिकलला दिलेल्या नोटीसमध्ये काय?

एफडीएच्या चमूने बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयातील उपाहारगृहाची तपासणी केली असता तेथे अस्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेबाबतच्या नोंदी नसणे, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल नसणे अशा त्रुटी आढळल्या. त्यावर एफडीएने महाविद्यालय प्रशासनाला १५ दिवसांत सुधारणा करण्याची नोटीस बजावली. १५ दिवसानंतर पुन्हा निरीक्षण केले जाईल.

आणखी वाचा-नागपूर: महावितरणमधील विनंती बदल्या वादात!

“विषमज्वर वा इतर आजाराबाबत संबंधित डॉक्टरच सांगू शकतील. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल आणि या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालातूनच स्पष्ट होईल. अधिष्ठात्यांनी एफडीएला माहिती देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.” -डॉ. मनीष ठाकरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

“एफडीएच्या चौकशीत विद्यार्थिनीने अर्धीच पाणीपुरी खाल्ल्याचे पुढे आले. संबंधित पाणीपुरीचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. विक्रेत्याकडे परवाना नसल्याने त्याला व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. मेडिकलकडून आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.” -सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन.