नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या अफलातून कामासाठी फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी देशात आतापर्यंत कोट्यवधींचे रस्ते आणि उड्डाणपूल बांधलेले आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा येथे त्यांनी कोट्यावधीच्या कामाचे भूमिपूजन केले आहे. आपल्या जन्म गावात केलेल्या कामांबद्दल गडकर्‍यांनी काय सांगितले ते पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हजारो कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो. पण आज विदर्भाचे पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा येथे दोनशे कोटींची विकासकामे मला दोन लाख कोटींची वाटत आहे. कारण धापेवाडा हे माझे गाव आहे. आता येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा तर कायापालट होणारच आहे, शिवाय गावाचाही पर्यटन व तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार आहे, असे सांगतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी धापेवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. धापेवाडा विकास आराखड्यांतर्गत १६४.६१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले.

धापेवाडा येथे टेक्स्टाईल पार्क, मंदिराचा जिर्णोद्धार, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्टेडियम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत. ही परिवर्तनाची सुरुवात लोकांच्या सहकार्यानेच होत आहे. विकास आराखडा मंजूर झाला. आता धापेवाड्याला आदर्श गाव करण्याची जबाबदारी गावाची आहे. महाराष्ट्रातील सुंदर-स्वच्छ गावाचा पुरस्कार आपल्या गावाला मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले. यावेळी कारंजा ते पांढुर्णा हा रस्ता मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.

गडकरी म्हणाले, ‘धापेवाडा टेक्स्टाईलमध्ये कोश्याचा साड्या तयार झाल्या. आज या साड्यांना भारतात मागणी आहे. ज्या गावातून हातमाग हद्दपार झाला होता, त्याठिकाणी येथील महिला उत्तम साड्या विणत आहेत. हे आव्हान आम्ही स्वीकारले आणि त्यात यश मिळाले. धापेवाडा, सावनेर, खापा या परिसरातील महिलांना उत्तम प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’ धापेवाडा टेक्स्टाईलच्या साड्या जगभरात जातील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

‘फार्मर बिझनेस स्कूल’ची गरज

पूर्वी संत्रा हे या भागातील मुख्य पिक होते. पण आज एका एकरात चार ते आठ टन संत्रा होतो. स्पेनमध्ये मात्र ३० ते ४० क्विंटलपर्यंत संत्रा होतो. स्पेनच्या दौऱ्यात संत्र्याचे उत्पन्न जास्त असण्याचे कारण जाणून घेतले. तेथील फार्मर बिझनेस स्कूलला भेट दिली. त्या शाळेतील संचालक मंडळात नारायण मूर्ती आहेत. नारायण मूर्तींचे पाच मिनिटांचे भाषण ऐकल्यावर आपली जबाबदारी वाढल्यासारखे वाटले. विदर्भातही फार्मर बिझनेस स्कूल सुरू करण्याची गरज आहे. येथील युवा शेतकऱ्याने कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार केले पाहिजे असा उद्देश आहे, असेही  गडकरी म्हणाले.

श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा होणार कायापालट

धापेवाडा श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान मंदिराचा विकास आराखडा, पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तसेच धापेवाडा येथील नदीचे रुंदीकरण व खोलीकरण या कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिर परिसरात सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आला. यात १६४.६१ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. यामध्ये संपूर्ण मंदिर परिसराच्या विकासकामांचा समावेश आहे. विठ्ठल मंदिर परिसरात प्रार्थना सभा, प्रदक्षिणा मार्ग, प्रशासकीय इमारत, कोलबा स्वामी मंदिर परिसराचा विकास, भक्त निवास, चंद्रभागा नदीच्या काठावर स्वामी कोलबास्वामींची ५१ फुटाची मूर्ती या कामांचा समावेश आहे. या कामांतर्गत गर्भगृहाचा आकार वाढविण्यात येईल. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी चंद्रभागा नदीवर नव्या पुलाचे काम होणार आहे. २० बस, १५० चारचाकी, ५०० दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था, इलेक्ट्रिक बस, उद्यान, सौरउर्जा यंत्रणा, नदीचे सौंदर्यीकरण या कामांचाही समावेश आहे. त्यासाठी ८९ लाख रुपयांची स्वच्छता योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पुराची समस्या दूर होईल व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.