लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर म्हंटले की तेथील रुंद रस्ते डोळ्यापुढे येतात. सर्व शहरात सिमेट रस्तांचे जाळे पसरले आहे. मात्र त्याचा फायदा पादचारी, वाहनधारकांना कमी आणि मोकाट जनावरांच्या ठिय्यासाठी अधिक होताना दिसतो. दक्षिण नागपूरमधील मानेवाडा मार्गावर ज्ञानेश्वर नगरमध्ये मोकळ्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. तो पार कसा करायचा हा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.
तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक यादरम्यान रस्त्यावर सकाळी सकाळी ८ पासून तर १० वाजेपर्यंत गाईंचा कळपच बसलेला दिसतोय. काही जनावरे रस्त्यात मध्यभागी ठिय्या मांडतात तर काही चालत फिरत असतात. सकाळची वेळ शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धावपळीची तर सकाळी दहा वाजता चाकरमानी कार्यालयात जाण्याच्या घाईत असतात. अशा वेळी त्यांच्या वाहनाना ही जनावरे धडकून अपघात होण्याचा धोका असतो.
आणखी वाचा-पाहुणा म्हणून आला अन् मामाच्या मुलीला घेऊन पळाला… भाच्यावर अपहरणाचा गुन्हा
महापालिकेत मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा आहे, मात्र त्यांच्या निदर्शनास ही बाब अद्याप येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्यांच्या मालकीची ही जनावरे आहेत त्यांना नोटीस बजावून कारवाई करता येऊ शकते. लोकांसाठी धावली तरी महापालिका कसली ? गुरांच्या मालकांनाही याचे काही सोयर सुतक नाही. ते सकाळी त्यांना सोडून देतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. रस्त्यावरून वाहने घसरण्याची शक्यता असते. अशा वेळी मोकाट जनावरे मध्ये आली तर वाहनधारकांची तारांबळ उडते.