महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचे महत्त्व देशांतर्गत वाढत असताना शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेवर आहे. त्यामुळे एकविसाव्या शहरात स्मार्ट नागपूरची वाहतूक व्यवस्था ‘स्मार्ट’ कशी होणार याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात १६ लाख ६१ हजार ८८२ नोंदणीकृत वाहने आहेत. दररोज शहरात पन्नास हजारांवर वाहने येतात. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१५ दरम्यान शहरात ५ हजार ६२७ अपघात झाले असून १ हजार २६८ लोकांचा मृत्यू झाला. तर २ हजार ७८८ लोक अपघातात गंभीर जखमी झाले. शहरातील जवळपास ३० लाख लोकसंख्येची जबाबदारी वाहतूक शाखेचे ५३० वाहतूक शिपाई आणि ८ पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा एकूण जवळपास तीस अधिकाऱ्यांच्या खांद्यांवर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिशानिर्देशानुसार प्रत्येकी १ लाख लोकसंख्येच्या मागे किमान ३०० पोलीस शिपाई असणे आवश्यक आहेत. नागपुरात हे प्रमाण अतिशय अल्प आहे. देशाचीही स्थिती यापेक्षा वेगळी नसून प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये केवळ १३० पोलीस शिपाई आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सांभळण्यासाठी वेगळी वाहतूक शाखा निर्माण करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त भरत तांगडे हे नागपूर वाहतूक शाखेचे प्रमुख असून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा आणि एमआयडीसी या सहा झोनमध्ये वाहतूक विभाग विभागला आहे. प्रत्येक झोनला ८० ते १०० शिपाई पुरविण्यात आले आहेत. त्यात सिग्नलवरील सुरक्षा, रस्त्यांवरील अवैध वाहनतळे, वाहतूक गस्ती पथक कार्यालय, जामर आदी कामांसाठी शिपाई वापरण्यात येतात. या अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुटय़ा, आजारपण आदी कारणेही लागू आहेत. त्यामुळे दररोज प्रत्यक्षात कामावर असणाऱ्या शिपायांची संख्या लक्षात येईल. शहरांचा विस्तार दिवसेंदिवस रुंदावत असताना सुरक्षा यंत्रणा अतिशय तोकडी होत आहे. शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. त्यासंदर्भात राज्य सरकारकडे सीसीटीव्हीचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. आता स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन सीसीटीव्हीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. परंतु चौकाचौकात सीसीटीव्ही बसवून विस्कळीत वाहतूक व्यवस्था रुळावर येईल का? असा सवालही करण्यात येत आहे. सीसीटीव्हीनुसार योग्य वापर करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नियंत्रण उभे करावे लागतील. त्यासाठी तंत्रकुशल आणि प्रशिक्षित पोलिसांची आवश्यकता आहे. चौकाचौकात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तैनात असलेल्या शिपायांवर कारवाईंचा अतिरिक्त भार असायला नको. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेगळया चमूची आवश्यकता आहे.
पोलीस भावनाप्रधान हवे
केवळ सीसीटीव्ही बसवून वाहतूक व्यवस्था सुधारता येत नाही. यासाठी भावनाप्रधान आणि कठोर पोलीस शिपायांची आवश्यकता आहे. सामाजिक मुद्दय़ांवर पोलीस भावनाप्रधान असायला हवे. पण, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना ते कठोर हवेत, असे मत सेवानिवृत्त अधिकारी रायभान चहांदे यांनी व्यक्त केले.
विस्कळीत वाहतूक व्यवस्था ‘स्मार्ट’ कशी होणार?
एकविसाव्या शहरात स्मार्ट नागपूरची वाहतूक व्यवस्था ‘स्मार्ट’ कशी होणार याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Written by मंदार गुरव
First published on: 10-12-2015 at 01:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to become smart fragmented transport system