नागपूर: होळी या सणाला वाईट प्रवृत्तीवर मात करणारा, मनोमिलन घडविणारा, रंगाची उधळण करणारा सण म्हणून बघितले जाते. परंतु या सणात रासायनिक रंगाचा वापर केल्यास लहान मुलांपासून वृद्धापर्यंतच्या व्यक्तीला डोळे, त्वचेचे गंभीर आजार संभावतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होळीच्या दिवशी रासायनिक रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यापैकी लाल रंग हा मरक्युरी सल्फाइटपासून तयार होतो. यामुळे त्वचेचे आजारासह कर्करोगही संभावतो. काही प्रकरणांत तर अर्धांगवायूचा झटकाही येण्याचा धोका आहे. जांभळा रंग क्रोमिअम आणि ब्रोमाइटपासून तयार होतो. हिरवा रंग कॉपर सल्फेटपासून तयार होतो. हे रंग वापरल्यास त्वचेची जळजळ होते. डोळ्यात रंग गेल्यास ते निकामीही होण्याची शक्यता असते.

हेही वाचा…राज्यात वीज संकट! कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच बंद

काळा रंग लेड ऑक्सइडपासून तयार होतो. दरम्यान एकंदरीत स्थिती बघता सगळ्याच रंगात जीवघेणे रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे हे रंग मुलांच्या नाका- तोंडात, कानात, डोळ्यात गेल्यास त्यांनाही विविध आजार संभावतात. तर रासायनिक रंग लावल्यास गर्भवती महिलेचा बाळ मतिमंद म्हणूनही जन्माला येऊ शकते. सोबत रंग लावतांना धाव- पळीत मुलांचे हात- पाय फ्रॅक्चर होण्यासह डोळ्यासह इतरही शारिरीक इजा संभावते. तर बळजबरीने रंग लावताना घर्षणाने त्वचेसह डोळ्यालाही इजा संभावते. हे धोके टाळण्यासाठी प्रत्येक पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी वर्तवली.

नैसर्गिक रंगाचा वापर करा- डॉ. अविनाश गावंडे

मुलांना होळी खेळायची असल्यास नैसर्गिक रंग करून देणे फायद्याचे आहे. हे रंग घरीच तयार करता येतात. त्यानुसार पळसाची फुले, हळद, मेहंदी, बीट रूटचा वापर करून पिवळा रंग तयार करता येतो. याशिवाय कोथिंबीर, पालक, पुदीना, टोमॅटोची पाने यांच्या पेस्टने हिरवा रंग तयार करता येतो. हे रंग पाण्यात टाका व दोन चमचे मेंहंदी टाकून एक लिटर पाण्यात उकळून घ्या. यातूनच हिरवा रंग तयार होतो, हे रंग मुलांनी वापरल्यास आजाराचे धोके कमी होतात, अशी माहिती डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

हेही वाचा…नागपूर : उमेदवार ठरवताना काँग्रेसचा ‘ग्रासरुट’ फार्मुला; माजी महापौर, जि.प. अध्यक्षांना संधी

रंग खेळण्यापूर्वी आवश्यक

पालकांनी रंग खेळणाऱ्या मुलांच्या अंगाला खोबरेल तेल लावून द्यावे. केसालाही तेल लावावे. डोक्याला, केसांना इजा होऊ नये म्हणून स्कार्फ, टोपी वापरावी. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी साधा चष्मा वापरावा. केमिकल रंग नखांतून शरीरात प्रवेश करू शकतात म्हणून वाढलेली नखे कापून टाकावी. संपूर्ण अंग झाकेल, असे सुती कापड परिधान करावेत. जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवावेत. नैसर्गिक रंग वापरण्यासाठीच सर्वांना उद्युक्त करावे. रंग निघाल्यानंतरच खाद्यपदार्थांना हात लावावा, असेही डॉ. गावंडे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to children celebrate holi with natural colors avoiding harmful chemicals mnb 82 psg