नागपूर: महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेची घोषणा केली. नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी या एक्स्प्रेसवेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल, असे सांगितले जात आहे. या एक्स्प्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत, पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे असणार आहे.
या एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील ३ शक्तीपीठे, २ ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. यामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे १० तासांनी कमी होईल. सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ आधीच कमी झाला आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग ११ जिल्ह्यांतून धावणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला चालना मिळणार आहे. ९ मार्च २०२३ रोजी नागपूरला गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्गशी जोडणाऱ्या या द्रुतगती मार्गाची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे; पॉवर ब्लॉकमुळे ८ रेल्वेगाड्या रद्द
असा आहे मार्ग
- लांबी ७६० किलोमीटर
- सहा पदरी द्रुतगती मार्ग
- प्रकल्पाची अंदाजित किंमत ७५ हजार कोटी रुपये
- समाविष्ट जिल्हे ११ – यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा)
- प्रवासाचा कालावधी – नागपूर ते गोवा दरम्यान 8 तास. प्रवासाचा वेळ १३ तासांनी कमी होणार.
- मालकी – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
- कधी पूर्ण होणार – तारीख निश्चित्त नसली तरी हा एक्सप्रेसवे २०२८ किंवा २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.