आजपासून बारावीची परीक्षा
नागपूर : गुरुवारी, २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून विभागातून १ लाख ६६ हजार २३५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दरम्यान शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना यंदाही फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत: रस्त्यावर असलेल्या शाळा तसेच सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असलेल्या मार्गावरील केंद्रावर पोहोचताना विद्यार्थ्यांना खूप आधी घरून निघावे लागणार आहे.
दरम्यान, गुरुवारी अनेक पालकांनी वाहतूक कोंडीच्या पाश्र्वभूमीवर केंद्राकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा शोध घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरात विविध ठिकाणी सिमेंट रस्ते, उड्डाण पूल आणि मेट्रोचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी अरुंद मार्गावर केबलसाठी नाल्या खोदण्यात आल्या आहेत. परीक्षेची वेळ सकाळी अकराची म्हणजे वर्दळीच्या वेळेचीच आहे. या काळात वर्धा मार्गासह जेथे कामे सुरू आहेत तेथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. यावेळी काही शाळांच्या विद्यार्थ्यांना लांबचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. (पश्चिम नागपूरच्या मुलांना मध्य नागपुरात) पश्चिम आणि मध्यला जोडणाऱ्या रस्त्यावर (राजीव गांधी चौक ते अजनी ) एका बाजूने सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. येथे एकदा वाहन अडकले तर दुसरा मार्गच बाहेर पडण्यासाठी नाही. असे ठिकाण अनेक आहेत. द. पश्चिमध्ये सोमलवार शाळेसमोर केबलसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. रहाटे कॉलनी ते काँग्रेसनगर दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर न्यू इंग्लिश स्कूल आहे. तसेच हा मार्ग पश्चिम आणि मध्य नागपूरला जोडणारा आहे. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पालक त्यांच्या वाहनाने येतात. अशावेळी शाळेसमोरही कोंडी होते.
गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोची तयारी
परीक्षा केंद्रावर जाताना विद्यार्थ्यांची गैरसौय होऊ नये म्हणून मेट्रोच्या कामावर शीघ्रकृती दल तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा जवानांना सहकार्य करण्यास सांगण्यात आले. मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोडी होऊ नये म्हणून मेट्रोने सर्व खबरदारी घेतली आहे. पालकांना, विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यास हेल्पलाईन R मांक १८००२७०० ५५७ वर संपर्क साधावा, असे महामेट्रोतर्फे कळवण्यात आले आहे.
केंद्रांवर मोबाईल बंदी
पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी यंदा शिक्षण मंडळाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. प्रश्नपत्रिका पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. २५ प्रश्नपत्रिकांचा एक संच तयार करण्यात आला असून हे संच परीक्षा केंद्रांवर पाठवले जातील. वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत, तेवढय़ा प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. गेल्यावर्षीप्रमाणेच परीक्षा केंद्रांवर मोबाईल नेण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
केंद्राची संख्या वाढली
विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रे वाढवली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या घटली आहे. गेल्यावर्षी १ लाख ७२ हजार ४११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यासाठी ४५१ परीक्षा केंद्र होती. यावर्षी परीक्षा केंद्रे ४७१ आहेत. यंदा नागपूर जिल्ह्य़ातच नव्हे तर विभागातील विद्यार्थी संख्या घटली आहे. नागपूर ग्रामीण व शहर मिळून १५४ केंद्रे आहेत आणि ६४,९१९ विद्यार्थी संख्या आहे. दरम्यान, मंडळाने परीक्षेची पूर्ण तयारी केली असून केंद्रावर सुरक्षेच्या उपाययोजनाही केल्या आहेत. बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे मानले जाते.विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये, असे आवाहन मंडळ अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
घरून लवकर निघा
नागपुरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी दोन तास आधी घरून निघावे लागेल. शहराच्या सीमावर्ती भागातील तसेच शहरालगतच्या गावातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी नागपुरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांना वेळेत परीक्षा केंद्र गाठणे मोठीच तारेवरची कसरत आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पालकांनी वेळीच खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांना १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यास मदत करावी, असे आवाहन नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.