अमरावती : Maharashtra Board 12th Result Live Updates उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग चौथ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९६.३४ टक्के लागला होता, यंदा त्यात ३.५९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
हेही वाचा >>> यंदा बारावीचा निकाल का घटला? सविस्तर उत्तर देत शिक्षण मंडळ म्हणालं, “वेगळ्या वातावरणात…”
मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ३९ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ३८ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख २८ हजार ५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.७५ इतकी आहे.
अमरावती विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.१४ टक्के, कला शाखेचा ८६.६४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.२५ टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८५.१० टक्के इतका लागला आहे. उत्तीर्णतेच्या बाबतीत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६४ हजार ३६४ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ६१ हजार ४२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९४.८३ टक्के आहे, तर ७४ हजार २०० मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६७ हजार ४७९ मुले उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९०.९४ इतकी आहे.