करोना काळात सलग दोन वर्षे टाळेबंदमुळे नवतपाचा ताप फारसा जाणवला नसला तरीही, यावर्षी मात्र सुरुवातीपासूनच सूर्यनारायण कोपला आहे. नवतपाच्या ऐन शेवटच्या तीन दिवसात उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून नागरिकांना घराबाहेर देखील पडणे कठीण झाले आहे. तर अनेकांच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्या सूर्य नागपूर आणि जबलपूर शहराच्या मध्यात म्हणजेच वैदर्भीयांच्या डोक्यावर असल्याने त्याचा अधिक ताप जाणवतो आहे.
२५ मे ते ३ जून हा कालावधी म्हणजेच नवतापाचा कालावधी असून या कालावधीत मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाचे दिवस असतात. ४८.२ इतके सर्वाधिक तापमान या कालावधीत विदर्भात नोंदवले गेले आहे. सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे उच्च तापमानाचे नऊ दिवस. नवतपा तापला तर मॉन्सूनचा पाऊस चांगला होतो असा आजवरचा अभ्यास आहे. भौगोलिक आणि वैज्ञानिक भाषेत सांगायचे म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन होताना सूर्य एप्रिल ते जून ह्या तीन महिन्यात १३ ते २३.५० अक्षाशावर मध्य भारताच्या डोक्यावर असतो. म्हणजेच सूर्याची किरणे सरळ आपल्या भूभागावर पडतात आणि जमीन तापते आणि हवा तापू लागते. ह्या वेळेस राजस्थान, गुजरातकडून उष्ण वारे विदर्भ, मध्य भारताकडे वाहू लागतात आणि त्यामुळे आपल्याकडे ऊष्ण लहरी येऊ लागतात. हवामान खात्याने २०२१ हे वर्ष सर्वाधिक तापमानाचे वर्ष राहील असा अंदाज दिला होता, पण टोक्ते आणि यास वादळामुळे तापमान घटले, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.

Story img Loader