लोकसत्ता टीम
बुलढाणा: जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना चांगलाच तडाखा बसला आहे. खरीप हंगामात साडेसात लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी व अन्य पिकांना जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा जबर तडाखा बसला. यामुळे एकरी उत्पादनात प्रचंड घट झाली असताना पिकांना मिळणाऱ्या कवडीमोल भावाने जिल्ह्यातील कमीअधिक साडे पाच लाख शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला.
यापाठोपाठ ४ ते ७ मार्च दरम्यान बरसलेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या सुमारे अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना जबर फटका दिला आहे. पावणे दोन लाख हेक्टरवरील गहू, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
आणखी वाचा- अवकाळी मुसळधार; चना गहू कोसळला, आंबेमोहोर गळाला, होळी विझल्या
४ मार्चपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. नाजूक पीक समजला जाणारा गहू आडवा झाला असून चांगला भाव मिळणाऱ्या हरभऱ्याची हानी झाली आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा, लाडनापुर या परिसरातील संत्री जमीनिवर पडली आहे.