यवतमाळ : आर्णी तालुक्यातील दाभडी नजीक जंगलात मानवी अस्थी सापडल्याने एकच खळबळ उडाली. गुरूवारी दुपारी जंगलात मध गोळा करण्यासाठी गेलेल्या एका तरूणास एक बेवारस मोबाईल फोन सापडला. त्याने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोध घेतला असता मानवी अस्थी, केस, मुलामुलीचे कपडे आदी वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. या मानवी अस्थी व इतर वस्तू वर्षभरापूर्वी गावातून पळून गेलेल्या व अद्यापही बेपत्ता असलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> वर्धा : रेल्वे फुल्ल! प्रतीक्षा यादी दीडशेवर, आगामी दोन महिने रेल्वे आरक्षण नाहीच…
दाभडी गावातील अल्पवयीन प्रेमीयुगुल वर्षभरापूर्वी पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या आईने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी आर्णी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान, याच काळात गावातील एक तरूणही पळून गेला. त्यामुळे पळून गेलेले अल्पवयीन तरूण, तरूणीच प्रेमीयुगुल असल्याची चर्चा गावात होती. वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या या प्रेमीयुगुलाचा तपास पोलीस करत आहे. मात्र अद्यापही त्यांचा शोध लागला नाही.
मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यावेळी बेपत्ता संशयित मुलाचे वडील व भावाला अटक केली होती. ते दोघेही अडीच महिने तुरुंगात राहिले. मात्र पोलीस प्रेमीयुगुलाचा शोध घेऊ शकले नाही. अशातच दाभडी शिवारात गुरूवारी दुपारी जंगलात मध आणण्यासाठी गेलेल्या जनार्दन कांबळे या युवकास वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मोबाइल फोन अचानक सापडला. हा मोबाईल बपेत्ता असलेल्या मुलाचाच असल्याची खात्री त्याच्या भावाने केल्यानंतर गावकरी जंगलात गेले. तेथे बेपत्ता असलेल्या मुलाचे व मुलीचे कपडे कुजलेल्या अवस्थेत सापडले. शिवाय लगतच मानवी अस्थी, महिलचे केससुद्धा आढळून आले. याप्रकरणी आर्णी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेल्या सर्वच वस्तू जप्त केल्या व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविल्या.
बेपत्ता तरूण, तरूणीचे कपडे आदी साहित्य जंगलात सापडले असले तरी प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच याबाबत सर्व गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती आर्णी पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> मेळघाटात ‘फगवा महोत्सव’; आदिवासी संस्कृती, परंपरेचे होणार सादरीकरण
वर्षभरानंतर बेपत्ता मुला, मुलीचे कपडे आढळल्याने गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. ते प्रेमीयुगुल बेपत्ता आहे की, त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, या सर्व गोष्टी तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या मानवी अस्थी, मोबाइल, कपडे खरंच त्या बेपत्ता प्रेमीयुगुलाचे आहे की, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कोणी हा प्रकार केला, याचाही पोलीस तपास करत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, आर्णीचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक गणपत काळूसे व पथकाने भेट दिली.