लोकसत्‍ता टीम

अमरावती : मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील जामली आर वन परिक्षेत्रात खोंगडा नजीक मोटरसायकलने जात असलेल्‍या युवकावर वाघाने हल्‍ला करून त्‍याला ठार केल्‍याच्‍या घटनेनंतर मानव-वन्‍यजीव संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्‍यात गेल्‍या वर्षभरात वाघ, बिबट आणि इतर वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात ६१ जणांचा मृत्‍यू झाला तर ६५४ जण जखमी झाले आहेत. मेळघाटात गेल्‍या दोन वर्षांत वाघाच्‍या हल्‍ल्‍यात तीन बळी गेले आहेत.

जंगलाशेजारील गावालगत मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. विदर्भात वाघ-बिबट व अन्य वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. गावकरी दहशतीत वावरताना दिसतात. शेतजमिनीचा विस्तार, नागरी जीवन आणि मुलभूत विकासासोबत वाघांचे जतन हा मुद्दा विचारात न घेतल्यास मानव- वन्यजीव संघर्ष वाढत जाणार, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

वन्‍यप्राणी भक्ष्य शोधण्यासाठी संरक्षित जंगलातून निघून ग्रामीण क्षेत्रात शिरतात. त्यांना शेतात काम करणारे, जनावरे चारणारे आणि सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले ग्रामीण नागरिक दिसल्‍यानंतर ते हल्ला करतात. शेत आणि गावात बांधून असलेल्या जनावरांची ते शिकार करतात. जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेलेल्‍या आदिवासी व्‍यक्‍तीवर दबा धरून बसलेल्‍या वाघाने हल्‍ला केल्‍याने त्‍याचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाल्‍याची घटना हरीसाल नजीक ३ नोव्‍हेंबर २०२४ रोजी घडली होती.

मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील हरिसाल परिक्षेत्रातील केसरपूर आणि कारा येथे यापुर्वी दोन जणांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झाला होता. गेल्‍या दोन वर्षांतील तिसरी घटना सोमवारी उघडकीस आली. त्‍यामुळे या परिसरातील गावांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. रात्री एकटे जंगलात जाऊ नये, दिवसा देखील समूहाने ये-जा करण्‍याचे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे. उपलब्‍ध आकडेवारीनुसार केवळ सहा वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३,३६४ जण जखमी झाले. २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १२,४१० जनावरे जखमी झाली. तर, ४,६०९ बकऱ्या तसेच जनावरांचा मृत्यू झाला.

वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या ग्रामिणांना वन्यजीवांच्या आजूबाजूलाच राहावे लागते. अशात नागरिकांमध्ये जंगलात जाताना काय खबरदारी घ्यायची या विषयाच्या संबंधाने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. वनविभागाने अशा घटनांची गंभीर दखल घेऊन मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी ‘वॉर’ या वन्‍यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्‍थेचे अध्‍यक्ष नीलेश कांचनपुरे यांनी केली आहे.

Story img Loader