देवेश गोंडाणे
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) ढिसाळपणा पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. आयोगाने २३ जानेवारी २०२२ ला घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२१ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून यातील तब्बल आठ प्रश्न रद्द तर तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची नामुष्की आयोगावर ओढवली आहे. विशेष म्हणजे, आयोगाला गेल्या दहा वर्षांत एकाही परीक्षेची प्रश्नपत्रिका बिनचूक देता आली नसल्याने आयोगाचा कार्यभार आणि त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
२३ जानेवारी २०२२ ला ३९० पदांसाठी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची पहिली उत्तरतालिका २७ जानेवारीला जाहीर करण्यात आली. नियमानुसार पहिल्या उत्तरतालिकेवर ३ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. ऑनलाईन हरकती आणि तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने २३ मार्चला सुधारित अंतिम उत्तरतालिका संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये सामान्य अध्ययन पेपरमधील सात चुकीचे प्रश्न रद्द करण्यात आले तर तीन प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला. याशिवाय ‘सी-सॅट’ पेपरमधील एक प्रश्न रद्द करण्यात आला आहे. याआधी ‘संयुक्त परीक्षा गट-ब’ मध्येही आयोगाने अंतिम उत्तरतालिकेत दोन प्रश्नांना चुकीच्या उत्तराचा पर्याय दिला होता. यावर काही उमेदवारांनी न्यायालयातही धाव घेतली होती.
नवा सवाल.. आयोग पहिली उत्तरतालिका जाहीर करून विद्यार्थ्यांचे त्यावर आक्षेप मागवते. यात चुका समोर आल्यास काही प्रश्न रद्द केले जातात. त्यामुळे आयोग पहिली उत्तर तालिका कुठल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर तयार करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय आयोगाकडून वारंवार अशा चुका झाल्यास उमेदवारांनी नेमक्या कुठल्या अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा, असाही प्रश्न आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांमध्ये नजिकच्या लोकांना देण्यात येणारी पसंती आणि प्रश्नपत्रिका तयार करताना नसलेल्या गांभीर्यामुळे अशा चुका घडत असल्याची माहिती आहे.
नुकसान कसे?
‘सी-सॅट’ आणि ‘सामान्य अध्ययन’ अशा दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. आता सामान्य अध्ययन पेपरमधील सात प्रश्न रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या १४ गुणांचे नुकसान होणार आहे. अशा उमेदवारांना ‘सी-सॅट’मध्ये कमी गुण मिळाल्यास सामान्य अध्ययन आणि ‘सी-सॅट’चे गुण एकत्र केल्यास त्यांची १४ गुणांमुळे गुणवत्ता यादीतून बाद होण्याची शक्यता आहे. याउलट जे उमेदवार ‘सी-सॅट’मध्ये अधिक गुण घेतील त्यांच्यासाठी हा निर्णय लाभदायक ठरणार आहे. यामुळेच ‘सी-सॅट’ परीक्षा केवळ पात्रता गुणांवर ठेवावी अशी मागणी वारंवार होत आहे.
अशा चुकांमुळे उमेदवारांना मनस्ताप होतो. त्यामुळे भविष्यात आयोगाने अशा चुका टाळाव्या.
– दयानंद मेश्राम, माजी सदस्य, एमपीएससी.