नागपूर : करोना काळानंतर उपराजधानीतील सुप्रसिद्ध सावजी भोजनालयांसह इतरही लहान- मोठ्या हाॅटेल्समध्ये खवय्यांची गर्दी वाढली होती. ते नुकसानीतून सावरत असतांनाच आधी श्रावण, गणपती, पितृपक्ष आणि आता नवरात्रीमुळे मांसाहारासह इतरही पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, सावजी व हाॅटेल्सच्या व्यवसायात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली असून १०० कोटींचा फटका बसला, अशी माहिती हाॅटेल्स मालकांनी दिली.
नागपुरातील सावजी पदार्थ जगप्रसिद्ध आहे. देश- विदेशातील नागरिक नागपुरात आले की त्यांचे पाय सावजी भोजनालयांकडे वळतात. करोनाच्या दोन वर्षांत टाळेबंदी व निर्बंधामुळे या व्यवसायासह शहरातील लहान- मोठ्या हाॅटेल्स चालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. निर्बंध शिथिल झाल्यावर हा व्यवसाय पूर्वपदवार येऊ लागला होता. नवीन भोजनालये व हाॅटेल्स सुरू होऊ लागली. जिल्ह्यात सध्या लहान- मोठे सुमारे दीड ते दोन हजार सावजी, भोजनालये, हॉटेल्स, उपाहारगृह आहेत. त्यात सावजी भोजनालय व खानावळींचीही संख्या सर्वाधिक आहे. परंतु श्रावण महिना, गणपती, दुर्गा उत्सवामध्ये बहुतांश नागरिक मांसाहार करत नाही. त्यामुळे या काळात सावजी भोजनालयांचा व्यवसायात ६० ते ७० टक्के घट झाली. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही पदार्थ मिळणाऱ्या लहान- मोठ्या हॉटेल्सचा व्यवसाय निम्म्याने तर केवळ शाकाहारी पदार्थ ठेवणाऱ्यांचा व्यवसाय २५ ते ३० टक्क्याने कमी झाल्याचे भोजनालय व हाॅटेल्स मालकांनी सांगितले.
हेही वाचा : नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार ; ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी
“श्रावण महिन्यापासून सावजी भोजनालयाचा व्यवसाय पूर्वीच्या तुलनेत २५ टक्क्यांवर आला. कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघड झाले. पुढच्या काळात भरपाई होण्याची शक्यता आहे.” – रोशन पौनीकर, संचालक, विठोबा सावजी भोजनालय.
करात सवलत देण्याची गरज
“ करोनामुळे दोन वर्ष हाॅटेल व्यावसायिकांना फटका बसला. यंदा गाडी रुळावर येत असताना सुरुवातीला पावसामुळे, त्यानंतर गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सवामुळे ग्राहक संख्या ६० ते ७० टक्क्यांनी घटली. शासनाने हा व्यवसाय वाचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंतचा वेळ वाढवून देण्यासह विविध करातही सवलत देण्याची गरज आहे.” – स्वाती श्रीकांत शाक्य, संचालक, फार्म हाऊस किचन.
“ जिल्ह्यातील सुमारे दोन हजार हॉटेल्समध्ये सुमारे १० हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. करोनानंतर व्यवसाय वाढल्यावर मनुष्यबळाची मागणी वाढली. परंतु आता व्यवसाय निम्म्यावर आल्याने सुमारे १०० कोटींचा फटका बसला.” – हर्षल रामटेके, संचालक, बीईंग फुडिज रेस्ट्राॅरन्ट.