सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेली ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. रामजन्मोत्सवनिमित्त मंदिरातून गेल्या ५७ वर्षांपासून निघणारी शोभायात्रेचा आता केवळ नागपूरच नाही महाराष्ट्रात नावलौकिक असून लाखो लोक या शोभायात्रेत सहभागी होत असतात.
रेल्वेस्थानकाला लागून रामझुल्यावरून खाली उतरताना पोद्दारेश्वर राम मंदिर हा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. १९९१ ला श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी त्यावेळच्या रेल्वेस्थानकाजवळ भूमिपूजन झाले होते. रामभक्त आणि समाजसेवी जमनाधर पोद्दार यांनी या मंदिरासाठी त्यावेळी पुढाकार घेतला आणि त्यांनी स्वखर्चाने मंदिराचे बांधकाम केले होते. मंदिराच्या निर्मितीसाठी लाल काळ्या रंगाचे दगड त्यावेळी कोराडी येथून आणले होेते. त्यावेळी खास काशीवरून पंडित प्रभूदत्त हे पौरोहित्य करण्यासाठी आले होते. रामाचे मंदिर पोद्दार परिवाराने बांधले तेव्हापासून पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळख निर्माण झाली आहे आणि देशभरात या मंदिराचा नावलौकिक असून देशविदेशातील लोक प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी या मंदिरात येत असतात.
हेही वाचा >>>वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर
मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांच्या तीन सुंदर मूर्ती दिसतात. उजवीकडे पूर्वाभिमुख शिवमंदिर आहे. या मंदिरात नर्मदेश्वर शिवलिंगासह भगवान कार्तिकी, गणेश, शेषनाग, पार्वती यांच्या मूर्ती आहेत. दक्षिण व पूर्व यांच्यामधील कोपऱ्यात हनुमंताची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय सहा खिडक्यांमध्ये हनुमान, विष्णू-लक्ष्मी, गरुड, सुग्रीव, गंगा, महालक्ष्मी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. शंभर पूर्ण वर्षे झालेल्या या अनोख्या मंदिरात सर्व धर्माचे लोक येऊन दर्शन घेत असतात. यावेळी मंदिराचे विश्वस्त पुनीत पोद्दार यांनी सांगितले, आमची पाचवी पिढी मंदिरात कार्यरत असून या मंदिराशी आता लाखो लोक जुळले आहेत. रामनवमीला निघणारी शोभायात्रा ही साऱ्या देशाचे आकर्षणचे केंद्र झाली असून त्यासाठी रामजन्मोसवाच्या तीन महिने आधी तयारी सुरू असते.
सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम
मंदिरात केवळ धार्मिक नाही तर शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. दर कोजागिरी पौर्णिमेला दम्याच्या रुग्णांसाठी या ठिकाणी औषध दिले जात असून हजारो नागरिक त्याचा लाभ घेतात. येथील औषध घेतल्यानंतर अनेकांचा दम्याचा आजार बरा झाला झाला असल्याचा दावा करण्यात येतो. शिवाय आरोग्य शिबीरासह गरिबांसाठी शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात.
हेही वाचा >>>चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक
मोमीनपुरा भागातून रामरथावर पुष्पवृष्टी
मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिमांची वस्ती आहे. रामनवमनीनिमित्त निघणारी शोभायात्रा असो की मंदिरात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो मुस्लीम समुदायातील अनेक लोक त्यात सभागी होत असतात. शोभायात्रेच्यावेळी मोमीनपुरा भागातून रामरथावर पुष्पवृष्टी करून प्रभूरामचंद्राचा जयजयकार करतात. ही परंपरा गेल्या ५७ वर्षांपासून सुरू आहे.