चंद्रपूर : विदर्भाच्या काही भागाला शुक्रवारीही धुवाधार पावसाने झोडपले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून एक जण कारसह वाहून गेला आहे.चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे तसेच वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे पूर आला आहे. शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत. पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर- राजुरा, घुगुस-चंद्रपूर, वरोरा- वणी- यवतमाळ या मुख्य मार्गासह २० रस्ते बंद झाले आहेत. इरई धरणाचे तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने नदीकाठावरील ३४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोंडिपपरी तालुक्यात मित गेडाम हा कारसह वाहून गेला.
तेलंगणात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण गडचिरोलीतील पूरस्थिती गंभीर झाली असून धरणातून पाणी सोडल्याने इंद्रावती, प्राणहिता आणि गोदावरी नदीने रौदरूप धारण केले आहे. नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने रात्रभर मदतकार्य करून सुमारे ३३० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. तेलंगणातील कडेम धरण भरून वाहू लागले आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात उसंत
सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली मात्र, पश्चिम घाट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा, पंचगंगा नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गांवाचा रस्ते संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.