नागपूर : बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा शासकीय सेवांमधील टक्का वाढावा व त्यांना संशोधनाच्या संधी मिळाव्या या उद्देशाने बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांची स्थापना करण्यात आली. या तिन्ही संस्थांना समान तत्त्वावर योजना आणि लाभ सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, बहुसंख्य इतर मागासवर्गीयांसाठी कार्यरत असलेल्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) वारंवार निधीच्या कमतरतेचे कारण देत महत्त्वाच्या परीक्षांसाठी अद्यापही ‘आर्थिक साहाय्य योजना’ सुरू न केल्याने विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’, मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि इतर मागासवर्ग, विमुक्त भटके समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ काम करते. जे ‘बार्टी’ आणि ‘सारथी’ला तेच ‘महाज्योती’ला असे शासनाचे धोरण आहे. बहुजन कल्याण मंत्र्यांनीही अनेकदा तसे आश्वासन दिले आहे. मात्र, हे आश्वासन हवेतच आहे. ‘बार्टी’ आणि ‘सारथी’कडून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. जे उमेदवार वरील सेवांची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले असतील त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. बार्टीने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करून आर्थिक साहाय्यासाठी अर्जही मागवले हे विशेष.
हेही वाचा >>>नांदेडमधील अधिष्ठात्यांचा अपमान, नागपुरातही मेडिकल – मेयोतील डॉक्टर संतप्त…
या माध्यमातून उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठी बळ मिळते. याच धर्तीवर ‘महाज्योती’नेही महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, महाज्योतीने अद्यापही ही योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी या योजनांपासून वंचित आहेत.दुसरीकडे ‘सारथी’मध्ये मराठा समाजासह कुणबी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे इतर मागासवर्गातील कुणबी विद्यार्थी किमान ‘सारथी’मधून वरील परीक्षांसाठी लाभ घेऊ शकतात. मात्र, ‘महाज्योती’ने निधीच्या कमतरतेचे कारण देत अद्यापही या परीक्षांसाठी आर्थिक साहाय्य सुरू न केल्याने ओबीसींमधील कुणबी वगळता इतर विद्यार्थी लाभापासून वंचित आहेत.
जे ‘बार्टी’ आणि ‘सारथी’ला तेच ‘महाज्योती’ला असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. मात्र, इतर संस्थांमध्ये आर्थिक साहाय्य योजना सुरू असताना महाज्योतीने ती सुरू केलेली नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. यासंदर्भात आम्ही अनेकदा निवेदनेही दिली आहेत. – उमेश कोर्राम, स्टुडंट राइट्स असोसिएशन
आर्थिक साहाय्य योजना सुरू करण्यासंदर्भात महाज्योती सकारात्मक आहे. हा विद्यार्थी हिताचा निर्णय असून लवकरच लागू व्हावा यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेला ठेवण्यात आला आहे. – राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.