लोकसत्ता टीम
अकोला : शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील विद्यार्थ्याची गुन्हेगारांच्या टोळीने हत्या केली. निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला असून या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी या मागणीसह शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात मंगळवारी दुपारी उबाठा शिवसेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलीस अधीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेला विद्यार्थी विशाल झाटे याची नववर्षाच्या सुरुवातीला क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. व्यसनाधीन युवकांनी हे हत्याकांड घडवून आणले. अत्यंत भयावह घटनेमुळे शहरातील विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमुळे शहराची बदनामी होत आहे. शहरांतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हेच पोलिसांची वसुली करतात. त्यांचेच अवैध धंदे आहेत. त्यामुळे शहरांतील गुंडगिरी वाढलेली आहे. त्यावर पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरातील शास्त्री नगर, रणपिसे नगर, राऊतवाडी, जवाहर नगर, हनुमान नगर, राम नगर, जठारपेठ, गोरक्षण मार्ग आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिकवणी वर्ग असल्याने परिसरात विद्यार्थ्यांचे वास्तव्य असते. परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड होण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडतात. भीतीपोटी विद्यार्थिनी व त्यांचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे चांगलेच फावते. या टवाळखोरांचा पोलीस देखील बंदोबस्त करीत नाही, असा आरोप उबाठा शिवसेनेकडून करण्यात आला.
आणखी वाचा-नागपूर : प्रेयसीच्या हट्टापोटी प्रियकर पोहचला कारागृहात
शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होण्यासाठी उबाठा शिवसेनेकडून मंगळवारी दुपारी मूक मोर्चा काढण्यात आला. जवाहर नगर येथून मोर्चाला प्रारंभ होऊन तो पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. शहरातील शिकवणी वर्गाच्या संचालकानी या मूक मोर्चाला समर्थन दिले होते. या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.