चंद्रपूर : जालन्यातील आंदोलनात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. जरांगे पाटील याच्या मागणीविराेधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आज सोमवारपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याविरोधात विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले रवींद्र टोंगे यांनी कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून ओबीसीकरण केले तर राज्यात आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा दिला आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय गणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, सर्वाेच्च न्यायालयाने लादलेले ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी आदी मागण्यांसह एकूण १२ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. अन्नत्याग आंदोलनातून परिस्थिती चिघळली तर त्याची सर्वस्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील असाही इशारा दिला आहे.
हेही वाचा – गोविंदांची सुरक्षितता वाऱ्यावर! दहीहांडीप्रसंगी घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण?
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे, सचिव राजुरकर, कुणबी समाज अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, तेली समाजाचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, दिनेश चोखारे, आकाश साखरकर, राजेंद्र खांडेकर, शाम लेंडे, अरुण तिखे, गणेश आवारी, हितेश लोडे, रणजित डावरे, अक्षय येरगुडे, मनिषा बोबडे यांच्यासह बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.