लोकसत्ता टीम
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) राज्यातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना बँक, रेल्वे, एलआयसी आदी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील ३० प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू होता. मात्र, ३० प्रशिक्षण केंद्राचे अचानक काम बंद करत नव्याने केंद्र निवड प्रक्रिया करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाचे सचिव व बार्टीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रक्रिया करीत आहेत. यामुळे राज्यातील ७८ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंद पडले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व अन्य नेत्यांची अनेकदा राज्य सरकारांना विनवणी करूनही प्रशिक्षण केंद्र सुरू होत नसल्याने आता संस्थाचालक व त्यांचे शेकडो कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.
आंदोलकांच्या निवेदनानुसार, या प्रशिक्षण कार्यक्रमाला २०१२ पासून सुरुवात करण्यात आली. यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये संस्था निवड प्रक्रिया पार पडली. २०१८ मध्ये पुन्हा सर्व जिल्हे मिळून एकूण ४७ प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्यात आले. २०१८-२०१९ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात ३०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान, ३ तपासण्या करून सर्व केंद्रांचे मूल्यमापन करण्यात आले. बार्टीच्या नियामक मंडळाने घालून दिलेल्या कठोर निकषांच्या आधारावर ४७ पैकी ३० प्रशिक्षण केंद्र पात्र ठरले.
ऑक्टोबर २०२१ ला शासन निर्णय निर्गमित करत मंजूर ३० प्रशिक्षण केंद्रांमार्फत हे प्रशिक्षण पुढील ५ वर्षे राबवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. असे असतानाही हा आदेश डावलून नव्याने निवड प्रक्रिया होत असल्याने आधीच्या ३० प्रशिक्षण संस्थांचे काम बंद पडले आहे. यामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आल्याने महाराष्ट्र दिनापासून उपोषण सुरु करणार आहे. तसे निवेदन, मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
कोणत्याही योजना बंद नाहीत- ‘बार्टी’
‘बार्टी’च्या प्रशिक्षणाच्या व इतर चालू असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाही. महाराष्ट्र दिनी अशाच काही संस्थांकडून मुंबईत उपोषण करण्यात येणार असल्याचे व त्यामध्ये विविध संस्था, विद्यार्थी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, संस्थाचालकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप ‘बार्टी’ने फेटाळल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगितले.