नागपूर: बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याची (पोक्सो) निर्मिती ही बालकांचे शोषण रोखण्यासाठी झाली आहे खरी. मात्र, काही प्रकरणांमध्ये केवळ आकसापोटी पुरुषांना बलात्कार आणि पोक्सोसारख्या घटनांमध्ये फसविले जाते, अशीही ओरड होते आहे. असेच प्रकरण समोर आले असून विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी एका वडिलाची पोक्सोच्या आरोपातून निर्दोष सुटका केली आहे.
चंदन (नाव बदलेले) असे या आरोपीचे नाव आहे. चंदन हा कळमेश्वर येथील रहिवासी असून मजुरीची कामे करतो. तो पत्नी व मुलीसोबत कळमेश्वर येथे राहत असे. त्याचा पत्नीसोबत वाद होता. त्यांच्यात सतत भांडणे होत होती. पत्नीने त्याच्याविरोधात कळमेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली होती. रमेशने आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप तिने त्याच्यावर लावला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपासांती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
हेही वाचा… “दोघांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करा, अन्यथा…”, संतप्त ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
ॲड. भूषण भेंडारकर यांनी आरोपीची बाजू मांडली. त्यांनी घेतलेल्या उलटतपासणी दरम्यान रमेशच्या पत्नीने, त्यांच्यातील भांडणांमुळे व गैरसमाजापायी तिने ही तक्रार दाखल केल्याचे मान्य केले. तसेच मुलीनेही रमेशने आपल्यावर बलात्कार केला नसल्याचे मान्य केले. याखेरीज याप्रकरणी वैद्यकीय तपासणीचे अहवालसुद्धा आरोपीच्या बाजूने होते व त्यावरून बलात्कार सिद्ध होत नव्हता. अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिले.