यवतमाळ : घाटंजी शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. ही घटना नेहरूनगर घाटंजी येथे घडली. काजल प्रफुल टिपले (२५) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे, तर प्रफुल गौतम टिपले (४०, नेहरु नगर, घाटंजी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्याशी वाद घालत होता.  रविवारी मध्यरात्री  काजल घरात झोपून असताना पती प्रफुलने तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. तिच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.

या प्रकरणी दुर्गेष कुंभारे रा. खापरी घाटंजी याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

महिला कर्मचारी मृतावस्थेत आढळली

प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत नातेवाईकाच्या लग्नाला न जाता घरीच थांबलेल्या महिलेचा मृतदेह घरातच झोपलेल्या अवस्थेत आढळला. प्रीती सचिन डाखरे (२८), रा. इस्तारी नगर, खापरी, घाटंजी असे मृत महिलेचे नाव आहे. ती महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात येते.

प्रीतीच्या पतीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले. तिला अंश नावाचा मुलगा आहे. ती आणि अंश हे दोघे इस्तारी नगरात सरला मडावी यांच्या घरी भाड्याने राहत होते. प्रीती सहा महिन्यांपासून घरीच असल्याचे माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. प्रीतीने रविवारी वडिलांना फोन करून आपली प्रकृती ठीक नसल्याने नातेवाईकाच्या लग्नाला येवू शकत नसल्याचा निरोप दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली नाही, त्यामुळे घरमालकीन सरला मडावी यांनी तिच्या खोलीत डोकावून पाहिले असता ती झोपून असल्याचे आढळले. मडावी यांनी प्रीतीच्या वडिलांना फोनवरून माहिती दिली. तेव्हा तिचे वडील, बहीण आणि जावई ईस्तारी नगरात तिच्या घरी पोहोचले. तेव्हा प्रीती पलंगावरच मृतावस्थेत आढळली. तिचे वडील हनुमान गोविंदराव बदकी (५८) रा.  वासरी, ता. घाटंजी यांनी याबाबत घाटंजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून घाटंजी पोलिसांनी मर्ग नोंद केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खंडागळे करीत आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत विविध चर्चा सुरू आहे