Wife on Porn Video: वैवाहिक वाद विकोपाला गेल्यावर एका पतीने थेट आपल्या पत्नीविरुद्ध अश्लील व्हिडीओसंदर्भात तक्रार दाखल करत खळबळ उडवून दिली. त्याचा आरोप होता की, पत्नी एका पॉर्न साईटवर दुसऱ्या व्यक्तीसोबत अश्लील कृती करताना दिसत आहे. पतीने सुरुवातीला याबाबत प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने याचिका अमान्य केल्यावर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

अनोळखी व्यक्तीने दिला व्हिडिओ

तक्रारदार पती विपिन बाबनराव कांबळे (वय ३४, रा. नागपूर) यांनी पत्नी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (अब्रूनुकसानी) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आरोपानुसार पत्नीने घरात अश्लील भाषा वापरून त्यांची मानहानी केली. मात्र, या कथित संवादास कोणताही साक्षीदार नव्हता. त्यामुळे अब्रूनुकसानीचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे म्हणत न्यायालयाने तक्रार फेटाळली.

त्यानंतर कांबळे यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६अ, ६७अ व ६७ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याने न्यायालयाला सांगितले की, एक अनोळखी व्यक्तीने त्यांना माहिती दिली की एका पॉर्न साईटवर त्यांची पत्नी एका पुरुषासोबत अश्लील कृती करताना दिसते आहे. त्यांनी स्वतः तो व्हिडिओ पाहिला असून त्या दोघांची ओळख पटल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. इतकेच नव्हे, तर पत्नीला त्यांनी पोलिस ठाण्यात चलण्यास सांगितले होते, परंतु तिने नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीही याबाबत काहीच कारवाई केली नाही, अशी खंत त्यांनी तक्रारीत व्यक्त केली होती.

आयटी कायद्याचा आधार

पतीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्या.एम.डब्ल्यु.चांदवानी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी दिलेल्या निर्णयात नमूद केलं की, तक्रारीमध्ये कुठेही स्पष्टपणे असे म्हटले नाही की आरोपी पत्नीने व्हिडिओ स्वतः अपलोड केला, प्रसारित केला किंवा अन्य कोणतेही अनैतिक डिजिटल कृत्य केले. त्यामुळे आयटी कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा सिद्ध होत नाही.

तक्रारीत केवळ संशय आणि भावनिक प्रतिक्रिया आहेत; कायदेशीर कारवाईसाठी ठोस पुरावे आवश्यक असतात, असे म्हणत न्यायालयाने तक्रार फेटाळली. पत्नीने अश्लील शब्दांचा वापर केला असल्याचा आरोपही पतीने केला होता. उच्च न्यायालयाने या आरोपाबाबत प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या निरीक्षणाचा पुनरुच्चार करत सांगितले की हा संवाद चार भिंतीच्या आत झालेला आहे. त्यामुळे अश्लील शब्दांचा वापर झाला हे कुणी ऐकले नाही. या कारणास्तव न्यायालयाने हा आरोपही फेटाळून लावला.