नागपूर : पत्नीने शरीर संबंधास नकार दिल्याने पतीने तिचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. पारशिवनी तालुक्यातील आमडी गावात शुक्रवारी पहाटे हा प्रकार पुढे आल्याने संपूर्ण गावच हादरले. आत्महत्येपूर्वी पतीने पत्नीचा मृतदेह जवळच्या तलावात नेऊन फेकला. कुसुमबाई युवनाती (४३) असे खून झालेल्या पत्नीचे तर मधुकर धोबा युवनाती (५३) रा. निमलताई कोथुळणा, ता. सावनेर असे पतीचे नाव आहे.
हेही वाचा >>> नागपूर : नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग खेळाडूंना विशेष रेल्वे बोगी
मधुकर युवनाती हा मूळ सौंसर येथील असून तो गेल्या वर्षभरापासून मौजा आमडी येथील चैतराम भालचंद बसोले यांच्या घरी कामावर होता. त्याची पत्नी कुसुमबाई मुलीकडे राहत होती. परंतु गुरुवारी ती पतीकडे आली होती. रात्री मधुकर याने मद्य प्राशन करून पत्नीला शरीर संबंधाची मागणी केली. पत्नीने नकार दिल्याने त्याने कुऱ्हाडीने तिचा खून केला व मृतदेह जवळच्या तलावात नेऊन फेकला. त्यानंतर घरी परतून गळफास घेतला. प्राथमिक तपासात शरीर संबंधास नकार दिल्याने आरोपीने पत्नीचा खून केल्याचे निदर्शनात येत असून सखोल चौकशीनंतर या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ह्रदयनारायण यादव यांनी सांगितले.