बुलढाणा : शेतीच्या वादावरून प्राणप्रिय पत्नीला धमक्या देऊन मारहाण करीत असल्याची माहिती मोबाईल वरून कळतच पतीला हृदयाचा झटका आला. यामुळे प्रकृती गंभीर झालेल्या पतीचे उपचार निधन झाले. पाषाण हृदयी माणसाला देखील पाझर फोडणारा हा हृदयद्रावक घटनाक्रम जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे घडला. अशोक शंकर ढगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सुनगाव येथील अशोक शंकर ढगे यांचे सुनगाव शिवारात शेत आहे. या शेतीचा वाद गेल्या कित्येक महिन्यापासून चालू असून सध्या प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे व मुलगा प्रतीक ढगे शेतामधील संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी प्रतीक ढगे व त्याची आई संत्र्याच्या झाडांच्या आळ्यामधील गवत कापून त्यांच्या शेताच्या धुर्‍यावर टाकत होते. त्यावेळी शेजारील वसंता लक्ष्मण ताडे याने, ‘शेताचे धुर्‍यावर गवत का टाकले?’ अशी विचारणा केली.

तसेच प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली यावेळी त्याची आई कुसुम ढगे मुलाला वाचवण्यासाठी आली असता वसंत ताडे याने अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे यांचे केस पकडून ओढत नेले. तसेच पायावर मांडी पाठ हातावर काठीने मारहाण करीत शिवीगाळही केली. एवढेच नव्हे ततर त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच शेताच्या धुऱ्यावर गवत टाकले तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.या घटनेची माहिती अशोक ढगे यांचा मुलगा प्रतीक यांने जळगाव पोलिसांना दिली. तसेच गजानन लक्ष्मण ताडे, पवन वसंत ताडे यांनी सुद्धा शिवीगाळ करून जीवे मारणे धमकी दिल्याची माहिती प्रतीक ढगे यांनी पोलिसांना दिली.

फोन आला अन घात झाला…

दरम्यान मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती अज्ञात इसमाने अशोक ढगे यांना भ्रमणध्वनी वरून दिली. यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला तसेच हृदयविकाराचा झटका येऊन अशोक शंकर ढगे यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस वसंत ताडे हे जबाबदार असल्याची तक्रार मुलगा प्रतिक ढगे याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली. तवसंत ताडे, गजानन ताडे, पवन ताडे,योगेश ताडे यांच्या विरोधात कलम ११८(१)११५(२),३५१(३),३५२,३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२(अ),९२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक इरफान शेख व संदीप रिंढे करीत आहे.