नागपूर : दहावीत असलेल्या मुलीचे बांधकामावर सिमेंट-विटा देणाऱ्या मजूर युवकावर प्रेम जडले. सहा महिने प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर दोघांनी मध्यप्रदेशात पळून जाऊन प्रेमविवाह केला. मात्र, पाच महिन्यांत आर्थिक चणचण, उपासमार आणि अन्य अडचणींमुळे दोघांच्याही डोक्यातून प्रेमविवाहाचे भूत उतरले. पतीने तिला नागपुरात सोडून पलायन केले. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वरमध्ये राहणारी पीडित १५ वर्षीय मुलगी स्विटी (काल्पनिक नाव) नववीत शिकते. तिचे वडील सिंचन विभागात अधिकारी तर आई परिचारिका आहे. दोघेही उच्चशिक्षित असल्यामुळे घरी शिक्षणाचे वातावरण. त्यांना लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर एकुलती मुलगी. त्यामुळे घरात तिचे लाड पुरविण्यात कोणतीच कसर नव्हती. दहावित गेल्यानंतर तिला स्मार्टफोन आणि दुचाकी घेऊन दिली. आईवडील दोघेही नोकरीवर गेल्यानंतर घरात ती एकटीच राहत होती. तिच्या घराशेजारी शक्ती तुंबडा (१९, रा. गोंदिया) नावाचा युवक राहायला आला. तो बांधकामावर एका मिस्त्रीच्या हाताखाली मजूर म्हणून काम करीत होता. शक्ती हा स्विटीच्या घरी पाणी मागायला गेला होता. घरात एकट्या असलेल्या स्विटीने त्याची चौकशी केली. त्यानंतर तो नेहमी तिच्या घरी पाणी मागायला येत होता. दोघांत मैत्री झाली.
हेही वाचा – नागपूर : गणेशपेठ बसस्थानक परिसरात ११ ट्रॅव्हल्सवर कारवाई
आईवडील कामावर गेल्यानंतर तो घरी यायला लागला. तसेच तिला शाळेपर्यंत सोडून द्यायला लागला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. स्विटी आईवडिलांचा पैसा शक्तीवर खर्च करायला लागली. दहावीची परीक्षा संपल्यानंतर दोघांनीही पळून जाऊन प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला. स्विटीने घरातून काही पैसे घेतले आणि दोघांनी मध्यप्रदेशातील भोपाळ शहराजवळील एक खेडेगाव गाठले. तेथे पोहोचल्यानंतर भाड्याने खोली घेऊन पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. शक्ती हा दिवसभर बांधकामावर जाऊ लागला तर स्विटी शेतमजुरी करायला लागली. काही दिवसांतच पैसे संपले आणि संसारात आर्थिक चणचण आणि खायचे वांदे झाले. दोघांनाही जगणे कठीण झाले. स्विटीलाही कळून चुकले तर तिला माहेरची आठवण झाली.
हेही वाचा – नागपूरच्या कोणत्या ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचा नमविस्तार?
गुन्हा दाखल, शोध सुरू
अल्पवयीन स्विटीला पळवून नेल्यानंतर आईवडिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेथून ते प्रकरण गुन्हे शाखेच्या एएचटीयू पथकाकडे आले. सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांच्या पथकाने त्या मुलीचा शोध घेतला. पोलीस मागावर असल्याचे शक्तीला माहिती पडले. त्यामुळे त्याने स्विटीला तिच्या घराजवळ सोडून पळ काढला. हुडकेश्वर पोलीस आता या गुन्ह्यात कलमवाढ करून आरोपीचा शोध घेत आहेत.