पतीचे कार्यालयातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे पत्नीने जाब विचारला. त्यावर संतापलेल्या पतीने पत्नीचे डोके टेबलावर आपटून खून केला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी पाचपावलीत उघडकीस आली. सोनू ऊर्फ सोनाली परशुराम बावणे (३५, लष्करीबाग) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम ब्राम्हणे हा मेयो रुग्णालयात शवविच्छेदनगृहात काम करतो. तो पत्नी सोनाली व दोन मुलींसह लष्करीबागमध्ये राहतो. त्याचे मेयोतील एका सहकारी कर्मचारी महिलेशी खास मैत्री आहे.

मात्र, त्याची पत्नी सोनाली हिला पतीचे अनैतिक संबंध असल्याची संशय होता. परशुराम हा केवळ मैत्री असल्याचे सांगून पत्नीची समजूत घालत होता. पतीच्या मैत्रिणीवरून घरात वारंवार वाद होत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोनालीला पतीच्या वागण्यावर संशय आला. ती पतीला न सांगता थेट मेयो हॉस्पिटलमध्ये पोहचली. त्यावेळी पती आणि ती मैत्रिणी महिला दोघेही एका खोलीत बोलताना दिसले. त्यामुळे तेथेच पती-पत्नीत वाद झाला. पती घरी आल्यानंतर पत्नीने त्या महिलेबाबत जाब विचारला असता परशुरामने विषय टाळला. गेल्या दोन दिवसांपासून घरात पती-पत्नीत कडाक्याचे भांडण सुरू होते. शनिवारी मध्यरात्री परशुरामने सोनालीचे डोके टेबलावर आपटून खून केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून परशुरामला अटक केली.

हेही वाचा : बाप आहे की राक्षस! ; सात दिवसांच्या मुलीला रस्त्यात टाकून पळाला

सोनालीच्या वारंवार वाद घालण्यामुळे कंटाळेल्या परशुरामने पत्नीचा काटा काढण्याचे ठरविले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत भांडत असलेल्या पत्नीचे टेबलवर डोके आदळून खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेल्या कपड्यातच परशुराम पाचपावली पोलीस ठाण्यात पोहचला. ‘साहेब, मी बायकोचा खून केला, मला अटक करा’ असे तो पोलीस ठाण्यात म्हणाला. पोलिसांना कपड्यावर रक्ताचे डाग दिसल्यामुळे लगेच त्याला ताब्यात घेतले. घरी जाऊन शहानिशा केला.परशुराम आणि सोनाली यांच्यात भांडण सुरू असताना त्यांची १० वर्षांची मुलगी मध्यस्थी करीत होती. सोनालीचे डोके आपटत असताना मुलीने वडिलाला विरोध केला असता त्याने मुलीवरही हल्ला केला. तिला जबर मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader