अमरावती : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यामध्ये पत्नी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

स्वाती शुभम आंधळे (३२) असे गंभीररित्या भाजलेल्या पत्नीचे तर शुभम भास्करराव आंधळे (२६) असे आरोपी पतीचे नाव आहे. शुभम हा पत्नी स्वाती यांच्यासह म्हाडा कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. गुरुवारी रात्री शुभमने पत्नी स्वाती यांना साडेतीन हजार रुपये मागितले. परंतु, स्वाती यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून शुभमने पत्नी स्वाती यांच्यासोबत वाद घालून त्यांचा मोबाइल फोडला. त्यावर स्वाती यांनी रागाच्या भरात पती शुभम याच्या दुचाकीचा हेडलाइट फोडला. वाद विकोपाला गेल्यावर शुभमने घरातील बाथरूममधील ॲसिड आणून पत्नी स्वाती यांच्या चेहऱ्यावर फेकले. त्यात स्वाती या गंभीररित्या भाजल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीररित्या भाजलेल्या स्वाती यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेत स्वाती या १३ टक्के भाजल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गरुड करीत आहेत.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार, ‘या’ विद्यापीठाने सुरू केली योजना

राजापेठजवळ झडतीत मिळाला देशी कट्टा

राजापेठ पोलीस ठाण्याजवळच्या एका हॉटेलसमोर दादागिरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या झाडाझडतीदरम्यान एकाकडे अवैध देशी कट्टा आढळून आला. याप्रकरणी, मोहम्मद दानिश मोहम्मद वहिद (२८), शहजाद शहा (२४) व जाहिद खान जाकिर खान (२२, तिघेही रा. रहमतनगर) यांना अटक करण्यात आली. त्यातील जाहिद खानने त्याच्या कमरेत देशी कट्टा खोवलेला होता.

हेही वाचा – वाहन एकाचे, वाहतूक चालान दुसऱ्याला; नागपूर पोलिसांच्या प्रतापाने….

हॉटेलसमोरील देशी दारू दुकानासमोर दोन-तीन युवक हे शस्त्राचा धाक दाखवून दादागिरी करीत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. तेथे कारवाई करताना जाहीद खान याच्या कमरेमध्ये देशी कट्टा मिळून आला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा व शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला.

Story img Loader