नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र विरोधी पक्षांमधील ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या ठरावाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द अजित पवार यांनीच सांगितलं आहे. तसेच या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले.
अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावासंदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता आपल्याला याबद्दल काहीही कल्पना नसल्याचं ते म्हणाले.
“मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे,” असं अजित पवार प्रसारमाध्यमांना उत्तर देताना म्हणाले.
काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकासआघाडीने घेतलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा असतानाच अजित पवारांनीच या प्रस्तावासंदर्भात अनभिज्ञ असल्याचं सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.